हैदराबाद - इंडियन आयडॉलच्या Indian Idol 12 च्या अंतिम फेरीत पवनदीप राजन या स्पर्धकाने बाजी मारली आहे. यामुळे राजनचे कुटुंबीय आनंदी झाले आहेत. अरुणिता कांजीलाल ही पहिली तर सायली कांबळे दुसरी रनरअप ठरली. अरुणिता कांजीलाल (Arunita Kanjilal), निहाल तोरो (Nihal Tauro), सायली कांबळे (sayali kamble), दानिश खान (Danish Khan), शनमुखप्रिया (Shanmukhpriya) आणि पवनदीप राजन (Pawandeep Rajan) इंडियन आयडॉलच्या अंतिम फेरीत होते. हिमेश रेशमिया, अनु मलिक, सोनू कक्कर यांनी पवनदीपला ट्रॉफी देऊन गौरविले.
12 तासाचा ग्रँड फिनाले
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून इंडियन आयडॉलच्या 12व्या सिझनचा अंतिम फेरीचा सोहळा 12 तासापेक्षा जास्त काळ चालला. यात ग्रँड फिनालेत सिद्धार्थ मल्होत्रा, कियारा आडवाणी, गायक उदित नारायण, कुमार सानू, अल्का यादनिक हे सहभागी झाले होते. त्याचरोबर ग्रेट खलीच्या एंट्रीनेही सर्व चकित झाले. या ग्रँड फिनालेमध्ये परिक्षक नेहा कक्कर दिसली नाही. शोच्या ग्रँड फिनालेत अरुणिता कांजीलाल, निहाल तोरो, सयाली कांबले, दानिश खान, शनमुखप्रिया आणि पवनदीप राजन या स्पर्धकांनी सोहळ्याला चार चाँद लावले.
दुसरी रनरअप ठरली सायली कांबळे
Indian Idol 12च्या सीझनमध्ये मराठमोठ्या सायली कांबळेने तिसरे स्थान पटकावले आहे. आधी तिचे नाव कोणालाच माहित नव्हते. मात्र या शोमुळे ती महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली आहे. 23 वर्षाची असलेल्या सायलीला बॉलीवूडमध्ये काम करण्याची इच्छा आहे. 1997 साली मुंबईतील एका मध्यमवर्गीय घरात जन्मलेल्या सायलीला लहानपणापासूनच गायनाची आवड होती. तिचे वडिल रुग्णवाहिकेचे चालक तर आई गृहिणी आहे. तिने आपल्या कारकीर्दीची सुरूवात मराठी गाण्यांपासून केली. सायलीने याआधी 'व्हाॅईस ऑफ इंडिया' आणि 'गौरव महाराष्ट्राचा' या शोमध्ये सहभागी झाली होती. संख्याशास्त्र या विषयात तिने पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. अनेक लाईव्ह शोज आणि कार्यक्रमातून तिने गाणी गायली आहेत.
हेही वाचा - सुजय डहाके दिग्दर्शित 'श्यामची आई' पूर्णतः शूट होणार ‘ब्लॅक अँड व्हाईट’ मध्ये!