मुंबई - हृतिक रोशनची मुख्य भूमिका असलेला 'सुपर ३०' चित्रपट १२ जुलैला प्रदर्शित झाला. आनंद कुमारांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. मात्र, जेव्हा चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता, तेव्हा हृतिकच्या या वेगळ्या लूकवर आणि त्याच्या भाषेवर प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत होत्या.
आता हृतिकनं स्वतःच आपल्या या रोलबद्दल आपलं मत मांडलं आहे. मी या गोष्टीवर खरंच विश्वास ठेवतो, की तुमचं बाहेरचं दिसणं हे तितक महत्त्वाचं नसतं. थोडक्यात एखादं पुस्तक कसं आहे, हे त्याच्या मुखपृष्ठावरून ठरवू नका. अनेकदा एखाद्या रस्त्यावर बसलेल्या व्यक्तीला पाहून तुम्ही असा विचार करता, की हा माझ्यापेक्षा हुशार असूच शकत नाही. पण तुम्हाला हे माहिती आहे का? की देव एखाद्याला ज्ञान देताना त्याची आर्थिक परिस्थिती, राहणीमान आणि इतर गोष्टी कधीही पाहत नाही.
याच कारणामुळे एखाद्या व्यक्तीचं मुल्यमापन त्याच्या बाहेरील रूपावरून करणे हे खूप घातक आहे. जेव्हा मी सुपर ३० ची स्क्रिप्ट वाचली, तेव्हा मी असाच विचार केला की ही व्यक्ती मी आहे. आनंद सर आणि माझा प्रवास हा दोन वेगळ्या रस्त्यांवरील आहे, हे खरं असलं तरीही आमच्या दोघांची मनं जुळणारी आहेत, हे मला समजलं आणि जेव्हा तुमची मनं जुळतात तेव्हा इतर कोणत्याच गोष्टीचा फरक पडत नाही, असं हृतिक म्हणाला.