मुंबई - बॉलिवूडला अनेक धमाकेदार चित्रपट देऊन गोविंदाने चित्रपटसृष्टीत आपली ओळख निर्माण केली. त्याचे 'दुल्हे राजा', 'हिरो नंबर १', 'कुली नंबर १' आणि यासारखे अनेक चित्रपट आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत, ज्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. मात्र, आपल्या फिल्मी करिअरमध्ये गोविंदाने अनेक चित्रपटात काम करण्यास नकारही दिला. यातील काही चित्रपट सुपरहीट ठरले.
त्याने नाकारलेले हे चित्रपट अनेक कलाकारांच्या करिअरसाठी महत्त्वाचे ठरले. यातीलच एक चित्रपट म्हणजे 'देवदास'. संजय लिला भन्साळी यांचं दिग्दर्शन असलेल्या देवदास सिनेमाने २००२ साली प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. भन्साळींनी सुरुवातीला चित्रपटातील शाहरूखच्या मित्राचा म्हणजेच चुन्नी लाल हा रोल साकारण्यासाठी गोविंदाकडे विचारणा केली होती. मात्र, गोविंदाने या चित्रपटाला नकार दिल्यानंतर याठिकाणी जॅकी श्रॉफची वर्णी लागली.
नुकतंच एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत गोविंदाने या चित्रपटाला नकार देण्यामागचे कारण सांगितले. त्यावेळी आपण सुपरस्टार होतो. अशात संजय लिला भन्साळी मला साईड रोल का देत आहेत? असा सवाल मी त्यांना केल्याचं गोविंदानं म्हटलं. यासोबतच शाहरूखला सांगा की, माझ्यासोबत याबाबत चर्चा कर. त्याने म्हटल्यास मैत्रीसाठी मी या चित्रपटात काम करेल, अन्यथा मला हा रोल साकारण्याची अजिबातही इच्छा नसल्याचे आपण भन्साळींना म्हटलो असल्याचे गोविंदानं यावेळी सांगितलं.