चंदीगढ - पंजाब हरियाणा उच्च न्यायालाने प्रसिद्ध रॅपर बादशहा याचा ऑनलाइन प्रमोटर (पब्लिसिटी) लविश कथुरियाला दिलासा दिला आहे. मुंबई पोलिसांनी दोघांना आरोपी करण्याची नोटीस जारी केली होती. या नोटीसीविरोधात लविश कथुरियाने पंजाब-हरयाणा उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने मुंबई पोलिसांची नोटीस रद्द केली आहे.
काय आहे प्रकरण?
रॅपर बादशाहाचे एक गाणे युट्यूबवर रिलीज करण्यात आले होते. हे गाणे एकाच दिवसात मोठ्या प्रमाणात लोकांनी पाहिले होते. मात्र, यामागे फेक फॉलोअर्स असल्याचा आरोप झाला होता. सोशल मीडियाचा गैरवापर करून फेक फॉलोअर्स मिळवण्याचा हा प्रकार असावा असा संशय पोलिसांना आला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
लविश कथुरियाच्या वकिलाने न्यायालयात सांगितले की, या प्रकरणात बादशाहा आरोपी आहे. माझा अशील मुंबईत राहत नसून पंजाबातील श्री मुक्तसर साहिब शहरात राहतो. मुंबई पोलीस फक्त त्यांच्या कार्यक्षेत्रातील व्यक्तीला नोटीस पाठवू शकतात. त्याच्या बाहेर राहणाऱ्या व्यक्तीला नोटीस देऊ शकत नाही. न्यायालयाने दोन्ही युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर नोटीस रद्द केली.