मुंबई - अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेला 'लक्ष्मी बॉम्ब' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा लूक प्रदर्शित झाला असून या हॉरर चित्रपटात अक्षय एका ट्रान्सजेंडर भूताच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे, चित्रपटाविषयी सध्या चर्चा सुरू असतानाच दिग्दर्शक राघव लॉरेन्स यांनी चित्रपटातून काढता पाय घेतला आहे.
या जगात पैसा आणि प्रसिद्धीपेक्षाही तुमचा आत्मसन्मान अधिक महत्त्वाचा आहे. तामिळमध्ये एक प्रसिद्ध म्हण आहे की, ज्या घरात तुम्हाला मान मिळत नाही, त्या घराची पायरी कधीही चढू नका. त्यामुळेच, मी या चित्रपटातून काढता पाय घेत आहे. मी चित्रपट सोडण्याचं कारण सांगू शकत नाही, कारण यासाठी एक नव्हे तर अनेक कारणं आहेत. त्यातील एक कारण हे आहे, की नुकतंच चित्रपटाचं फर्स्ट लूक पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं. परंतु, याबद्दल मला काहीही कल्पना दिली गेली नाही आणि चर्चाही केली गेली नाही.
एका दिग्दर्शकासाठी ही अत्यंत वेदनादायक गोष्ट आहे, की तुमच्याच चित्रपटाचं पोस्टर तुमच्याशिवाय इतरांकडून प्रदर्शित केलं जातं. मला स्वतःच या पोस्टरचं डिझाईन समाधानकारक वाटलं नाही, असं कधीच कोणत्या दिग्दर्शकासोबत घडू नये.
चित्रपट सोडताना मी माझी स्क्रीप्ट माघारीही घेऊ शकतो, कारण मी याबद्दल कोणतीही अॅग्रीमेंट साईन केलेली नाही. मात्र, मी ही स्क्रीप्ट त्यांना द्यायला तयार आहे, कारण मी ती माघारी घेतल्यास हे प्रोफेशनल राहणार नाही आणि मी अक्षय सरांची खूप इज्जत करतो. ते त्यांच्या इच्छेनुसार त्यांना हवा तो दिग्दर्शक निवडू शकतात. लवकरच मी अक्षय सरांची भेट घेऊन त्यांना ही स्क्रीप्ट देणार आहे आणि व्यवस्थितपणे यातून बाहेर पडणार आहे, असे म्हणत त्यांनी चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.