मुंबई: सुशांतसिंग राजपूत यांच्या निधनाने संपूर्ण फिल्म इंडस्ट्री हादरुन गेली आहे. या प्रकरणात एकामागून एक नवीन गोष्टी समोर येत आहेत. दरम्यान, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणात अभिनेता आदित्य पंचोली यांचा मुलगा सूरज पंचोली आणि अभिनेता दिनो मोरिया यांच्यावर आरोप केले होते. आता याचा खुलासा दिनो मोरिया याने ट्विटरवरुन केला आहे.
दिनो मोरिया याने आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय, ''माझ्या घरी अशी कोणतीच पार्टी झालेली नव्हती. कृपया असे आरोप करण्यापूर्वी पहिल्यांदा सत्यस्थिती चेक करा. माझे नाव यात घुसवण्याचा प्रयत्न करु नका कारण जे काही घडले त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही.''
माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ''सुशांतच्या मृत्यूच्या अगोदरच्या रात्री १३ जूनला अभिनेता आदित्य पंचोली यांचा मुलगा सूरज पंचोली यांच्या घरी पार्टी होती आणि सुशांतच्या घरापासून जवळच दिनो मोरियाचे घर आहे. १३ जूनच्या रात्री त्याच्या घरीही पार्टी होती. त्यानंतर दिनो मोरियाच्या घरातून निघून सर्वजण सुशांतच्या घरी गेले होते.''
हेही वाचा - करिनाच्या नेपोटिझ्मच्या मतांवर कंगना टीमने साधला निशाणा
सुशांतसिंग राजपूत याच्या मृत्यूबरोबरच दिशा सालियन हिच्या मृत्यूवरही राणे यांनी प्रश्नचिन्ह उभे केले आहे. नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे की, 'दिशा सालियनवर प्रथम बलात्कार करण्यात आला आणि त्यानंतर तिचा खून करण्यात आला.'
सुशांतसिंग राजपूत प्रकरणाचा खटला सीबीआयकडे सोपविण्यात येत असल्याची माहिती आहे. यासाठी सुशांतच्या वडिलांच्या संमतीनंतर बिहार सरकारने सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची शिफारस केली आहे. आज म्हणजे बुधवारी यासंबंधीचा निर्णय ऐकायला मिळणार आहे.