मुंबई - टीव्ही स्टार अंकिता लोखंडे राहत असलेल्या इमारतीत एक नवा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. त्यामुळे संपूर्ण इमारत सील करण्यात आली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, ज्या व्यक्तीची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे, तो मागच्या आठवड्यात स्पेन येथून भारतात परतला होता.
अंकित राहत असलेल्या अपार्टमेंट सोसायटीमध्ये ५ विंग आहेत. यामध्ये टिव्ही कलाकार नताशा शर्मा आणि आदित्य रेडिज यांचेदेखील घर आहे. त्यांच्याशिवाय, अशिता धवन, सैलेश गुलाबनी आणि अभिनेता मिश्कत वर्मा हे देखील येथेच राहतात.
ज्या व्यक्तीला कोरोना झाला आहे, त्याची भारतात परतल्यानंतर कोरोनाची टेस्ट निगेटिव्ह होती. तो १५ दिवस सेल्फ क्वारंटाईन देखील होता. मात्र, त्याला कोरोनाची लक्षण दिसू लागल्याने त्याने पुन्हा कोरोनाची चाचणी केली. तर, त्याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह निघाली. दरम्यान ज्यांनी ज्यांनी त्याची भेट घेतली, त्यांनी देखील कोरोनाची तपासणी केली आहे. सुदैवाने त्यांच्या टेस्ट निगेटिव्ह आहेत. २६ मार्चला ही सोसायटी सील करण्यात आली आहे. या सोसायटीबाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्त करण्यात आला आहे. सध्या या सोसायटीत कोणालाही प्रवेश करण्यास बंदी करण्यात आली आहे.