मुंबई - अभिनेत्री दीपिका पदुकोण हिची मॅनेजर करिष्मा प्रकाश हिला अटक न करण्याचे आदेश न्यायालयाने मंगळवारी दिले. काही दिवसांपूर्वी करिष्मा प्रकाशच्या घरी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) अधिकाऱ्यानी छापा टाकला होता. या छाप्यात तिच्या घरातून अमली पदार्थ मिळाल्याचा दावा एनसीबीकडून करण्यात आला होता. यानंतर चौकशीसाठी करिष्मा प्रकाश तिला समन्स बजावण्यात आले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून करिष्मा प्रकाश ही कुठल्याही प्रकारे संपर्कात नव्हती. यानंतर एनडीपीएस न्यायालयात करिष्मा प्रकाश हिच्याकडून अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल करण्यात आली होती.
या सुनावणीदरम्यान न्यायालयाने करिष्मा प्रकाशला ७ नोव्हेंबरपर्यंत अटक न करण्याचे आदेश देतानाच, याएनसीबीच्या चौकशीला सामोरे जावे, असे आदेशही देण्यात आले आहेत. करिष्मा प्रकाश चौकशीला पूर्ण सहकार्य करणार असल्याचे तिच्या वकिलांनी स्पष्ट केले आहे.
छाप्यात सापडले अमली पदार्थ - एनसीबीचा दावा
करिश्मा प्रकाशच्या घरातून अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. मात्र करिष्मा प्रकाश ही सध्या बेपत्ता असून तिचा जबाब नोंदविण्यासाठी एनसीबीकडून करिष्मा प्रकाशला समन्स बजावण्यात आले आहे. मात्र अद्यापही करिष्मा कुठे आहे, याचा पत्ता लागलेला नाही, असे एनसीबीने म्हटले आहे.
तर, करिष्मा घरात नसताना एनसीबीने टाकलेला छापा हा कायद्याच्या विरोधात असल्याचे तिच्या वकिलांचे म्हणणे आहे. एखादी व्यक्ती तिच्या घरामध्ये हजर नसेल तर तिच्या घरातून अमली पदार्थ नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला कसे काय मिळाले ? असा सवालही तिच्या वकिलांनी केला. करिष्मा प्रकाश हिला अगोदरही तीन वेळा एनसीबीकडून चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते. करिष्माने या चौकशीत एनसीबीला सर्व प्रकारे सहकार्य केले होते, असेही तिच्या वकिलांनी सांगितले.