मुंबई - श्रेयस तळपदे ‘इक्बाल’ मधून नावारूपास आला. त्यानंतर त्याने अनेक हिंदी व मराठी चित्रपटांतून विविधांगी भूमिका करत आपले चित्रपटसृष्टीत वेगळे स्थान बनविले. ‘पोश्टर बॉईझ’ सारख्या सामाजिक समस्येवर आधारित विनोदी चित्रपटाची निर्मिती श्रेयसने केली होती व त्याचा त्याच नावाचा बॉबी व सनी देओल अभिनित हिंदीत रिमेक बनविताना दिग्दर्शनक्षेत्रात पाऊलही टाकले.
अनेक चित्रपटांमध्ये भूमिका
हिंदी चित्रपट ‘डोर’, ‘अपना सपना मनी मनी’, ‘वेलकम टू सज्जनपूर’, ‘ग्रेट ग्रँड मस्ती’ व ‘सनई चौघडे’, ‘बाजी’ सारख्या मराठी चित्रपटांतून तो उच्च प्रतीचा अभिनय करताना दिसला. त्याच्या कॉमेडी अंगाचा दिग्दर्शक रोहित शेट्टी याने ‘गोलमाल’ च्या सर्व भागांत, पहिला सोडून, सुंदर उपयोग करून घेतला व श्रेयसनेही त्याचा विश्वास सार्थ ठरवला. गेल्या वर्षी तो ‘सेटर्स’ चित्रपटातून वेगळ्या भूमिकेत दिसला होता. टाळेबंदी काळात जेव्हा नाटकावर अवलंबित कर्मचाऱ्यांची व्यथा ऐकली तेव्हा श्रेयस तळपदेने मराठी नाटके रेकॉर्ड करून ती लोकांना दाखवण्याची संकल्पना सत्यात उतरवली. ही संकल्पना आहे वेब मालिका, सिनेमे याप्रमाणे नाटकांनाही ओटीटी प्लॅटफॉर्म देण्याची व त्यामुळे अनेकांना पुन्हा रोजगार मिळाला हे विशेष.
प्रजासत्ताक दिनाच्या पुढच्या दिवशी श्रेयसचा वाढदिवस असतो, त्यामुळे २६-२७ जानेवारी त्याच्या घरी मोठ्या उत्साहात साजरे होतात. पत्नी दीप्ती व मुलगी आद्या यांच्यासोबतचे फोटोज तो समाज माध्यमांवर पोस्ट करीत असतो. त्याने सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतानाचा व्हिडीओही पोस्ट केला होता. 'ईटीव्ही भारत' मराठीकडून बॉलिवूडमधील प्रसिद्ध मराठमोळा कलाकार श्रेयस तळपदेला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!