मुंबई : बॉलिवूड अभिनेता फराज खान याचे निधन झाले आहे. अभिनेता बऱ्याच दिवसांपासून आजारी होता आणि बेंगळूरमधील रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. अभिनेत्री पूजा भट्ट यांनी ट्वीट करून फराज यांच्या मृत्यूविषयी सांगितले आहे. फराज खान 46 वर्षांचा होता. फराज खानने मेहंदी या चित्रपटात राणी मुखर्जी सोबत काम केले होते. या चित्रपटातील त्याच्या कामाचेही खूप कौतुक झाले. फराज खान यांच्या निधनानंतर पुन्हा एकदा चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.
पूजा भट्टचे फराजबद्दल ट्विट
फराज खान यांच्या निधनाबद्दल पूजा भट्ट यांनी ट्वीट केले आहे, "फराज खान आपल्या सर्वांना सोडून गेला आहे हे मी जड अंतःकरणाने तुम्हाला सांगत आहे. आशा आहे की तो आता चांगल्या जगात जाईल. तुम्ही सर्वांनी मदत केली. त्याबद्दल धन्यवाद. फराजच्या कुटुंबाला जेव्हा सर्वात जास्त आवश्यक होती तेव्हा तुम्ही सर्व मदतीसाठी पुढे आलात. कोणीही फराजची जागा भरू शकत नाही. "
अनेकांची आर्थिक मदत
पूजा भट्टने अलीकडेच फराज खानला आर्थिक मदतीचे आवाहन केले होते. सलमान खानसुद्धा त्याला मदत करण्यासाठी पुढे आला होता. १९९६ मध्ये आलेल्या विक्रम भट्ट यांच्या 'फरेब' या चित्रपटात फराजने मुख्य भूमिका साकारली होती. १९९८ मध्ये रिलीज झालेल्या 'मेहंदी' चित्रपटात फराजने राणी मुखर्जीसोबत काम केले होते.