जोधपूर - काळवीट हत्या प्रकरणी बॉलिवूड अभिनेता सलमान खान जोधपूर जिल्हा आणि सत्र न्यायालयात आज हजर राहिला नाही. त्यामुळे न्यायालयाने १९ डिसेंबरला पुढील सुनावणी ठेवली आहे.
सलमान खान काळवीट हत्या प्रकरणात दोषी ठरला होता. न्यायालयाने त्याला ५ वर्षे तुरुंगात जाण्याची शिक्ष सुनावली होती. या निर्णयाच्या विरोधात सलमान सत्र न्यायालयात दाद मागत आहे. ४ जुलै रोजी सत्र न्यायालयाचे न्यायाधिश चंद्रकुमार सोनगारा यांनी सलमानला २७ सप्टेंबरच्या सुनावणीस हजर राहण्यास सांगितले होते. त्यामुळे तो आज हजर राहील अशी अपेक्षा होती.
सलमानला गँगस्टर लॉरेन्स बिश्णोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव तो आजच्या तारखेला हजर राहू शकला नसल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये त्याला अशाच प्रकारची धमकी लॉरेन्स बिश्णोईने दिली होती.
सलमान खानने एका शूटींगच्या दरम्यान १९९८ मध्ये दोन काळवीटांची गोळ्या घालून शिकार केली होती.