मुंबई - अभिनेता आयुष्यमान खुराणा याला यंदाचे वर्ष फारच लाभदायी ठरले आहे. यावर्षी रिलीज झालेले त्याचे सर्वच चित्रपट हिट ठरलेत. बॉक्स ऑफिसवरही त्याच्या चित्रपटांनी तुफान गल्ला जमवलाय. 'आर्टिकल 15', 'ड्रीम गर्ल' आणि 'बाला' या तीन चित्रपटांनी एकूण ५०० कोटींची कमाई केली.
आयुष्यमान सध्या सर्वात हिट चित्रपट देणारा अभिनेता बनलाय. यावर्षी रिलीज झालेल्या सर्वच चित्रपटांना उत्तम यश लाभलं तर आगामी चित्रपटांनाही उदंड प्रतिसाद मिळणार हे ठोकताळे बांधले जात आहेत. आयुष्यमानचा आत्मविश्वास यामुळे वाढला आहे. प्रेक्षकांना नवा, ताजा आणि प्रयोगशील आशय लागतो हे त्याने ओळखलंय. प्रेक्षकांसह टीकाकारांनाही तो चांगलेच मनावर घेतो आणि चित्रपटांची निवड करतो.
मनोरंजनासोबतच एक सकारात्मक चांगला संदेश प्रेक्षकांपर्यंत पोहोचला पाहिजे असा त्याचा आग्रह असतो. त्यामुळे चित्रपट साईन करताना तो हे नीट पडताळून पाहतो. गेल्या वर्षभरातील त्याचा हा अनुभव भावी चित्रपटांचा विचार करताना त्याला पुरक आणि लाभदायी ठरणार आहे हे निश्चित.