पुणे - कोरोनाच्या धास्तीने नागरिकांनी घराबाहेर पडणे बंद केले आहे. याचा परिणाच सर्वच उद्योगधंद्यांवर होत आहे. मात्र, पुण्यातील एका रिक्षावाल्याने यावर भन्नाट आयडिया शोधून काढली आहे. इब्राहिम तांबोळी असे या रिक्षाचालकाचे नाव आहे. त्यांना आपल्या रिक्षात जणू कोरोनाशी लढा देणारी यंत्रणाच बसवली आहे.
त्यांनी रिक्षात व्हेपोरायझर (वाफेचे यंत्र ) बसवले आहे. त्यातून प्रवाशांना शुद्ध हवा दिली जाते. शिवाय रिक्षात त्यांनी स्प्रे ठेवला असून त्यातून प्रवाशांच्या अंगावर सॅनिटायझर मिक्स असलेल्या पाण्याचा फवारा सोडला जातो. इतक्यावर न थांबता पैसे घेतानाही ते आधी सॅनिटायझर वापरतात. प्रवाशालाही देतात आणि नंतरच पैसे घेतात.
हेही वाचा -कोरोना खबरदारी : मध्यरात्रीपासून 'या' शहरातील चित्रपटगृहे, जिम्स, नाट्यगृहे बंद
कोरोनाची भीती बाळगण्यापेक्षा त्याविरोधात वैज्ञानिक पद्धतीने लढा देण्याची गरज असल्याचं इब्राहिम तांबोळी यांचं मत आहे. रिक्षात बसणाऱ्या प्रवाशांनाही त्यांची ही कोरोनाशी लढा देणारी यंत्रणा आवडली आहे. कोरोना व्हायरस पसरू नये यासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढायला हवे. स्वतःचीच नाही तर समोरच्या व्यक्तीचीही काळजी घेणे गरजेचे आहे. लोकांशी दररोज संपर्क येणाऱ्या प्रत्येकानं जर अशीच काळजी घेतली तर कोरोना शिल्लकही राहणार नाही.
हेही वाचा -कोरोनाशी दोन हात करण्यासाठी मोदींचे 'सार्क'ला आवाहन; 'या' देशांनी दर्शवली सहमती