मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन जाहिर झाल्यावर त्याचा सर्वच क्षेत्रांना मोठा झटका बसला आहे. त्यात करमणूक क्षेत्रही मागे राहिलं नाही. देशभरातील पाच हजाराहून अधिक थिएटर्स गेले तीन महिने पूर्णपणे बंद आहेत. त्यामुळे या व्यवसायावर अवलंबून असलेल्या लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला होता. दुसरीकडे ओटीटी प्लॅटफोर्मवर एकामागून एक हिंदी सिनेमे रिलीज करण्याच्या घोषणा व्हायला लागल्याने थिएटर्स आणि मल्टीप्लेक्स मालकांनी या निर्णयाला कडाडून विरोध केला होता. अखेर 'सुर्यवंशी' आणि '८३' हे सिनेमे थिएटर्समध्ये रिलीज करण्याची घोषणा झाल्याने वितरक आणि मल्टीप्लेक्स मालक यांचा जीव काहिसा भांड्यात पडला. दोन्ही सिनेमांच्या रिलीजच्या तारखा जाहिर झाल्या असल्या तरिही अद्याप थिएटर्स कधीपासून सुरू होणार याबाबत सरकारी पातळीवर काहीही ठरलेलं नाही.
देशभरात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली असली तरिही तिसऱ्या टप्प्यात थिएटर्स सुरू करण्याचा विचार होऊ शकतो अशी चर्चा आहे. त्यासाठीची नियमावली अजूनही ठरायची बाकी आहे. त्यामुळे या दोन्ही सिनेमांनी रिलीजच्या तारखा जाहिर केल्या असल्या तरिही प्रत्यक्ष हे सिनेमे त्याच दिवशी रिलीज होणार की पुन्हा त्यांच्या रिलीजच्या तारखा पुढे ढकलाव्या लागणार याबाबत आत्ताच काही भाष्य करता येणं अवघड आहे.
अक्षय कुमारचा रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सुर्यवंशी' आणि रणवीर सिंग याचा कबीर खान दिग्दर्शित '८३' या दोन्ही सिनेमांमध्ये प्रेक्षकांना पुन्हा थिएटर्सपर्यंत आणण्याची क्षमता आहे. एवढे महिने झालेलं नुकसान या दोन सिनेमांच्या कामगिरीने सहज भरून काढता येऊ शकेल. दुसरीकडे हे दोन्ही सिनेमे थिएटर्समध्ये रिलीज झाले तरच त्यासाठी घेतलेले कष्ट सार्थकी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता ठरलेल्या तारखेला हे दोन्ही सिनेमे थिएटरमध्ये झळकतील का याकडे बॉलिवूडसह संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.