नवी दिल्ली : गुप्तचर संस्थांकडून मिळालेल्या माहितीनंतर केंद्र सरकारने 14 मेसेंजर मोबाईल अॅप्लिकेशन्स ब्लॉक केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या मेसेंजर मोबाईल अॅप्लिकेशन्सचा वापर जम्मू - काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर दहशत पसरवण्यासाठी केला जात होता. या प्रकरणाची माहिती असलेल्या सरकारमधील एका अधिकाऱ्याने सांगितले की, गुप्तचर संस्थेकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे मोबाईल अॅप्लिकेशन्स काश्मीरमधील दहशतवाद्यांनी त्यांचे समर्थक आणि ऑन - ग्राउंड वर्कर्स (OGW) यांच्याशी संवाद साधण्यासाठी वापरले होते.
गुप्तचर संस्थांच्या मदतीने तयार केली अॅप्सची यादी : मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, एजन्सी ऑन - ग्राउंड वर्कर्स (OGW) आणि दहशतवादी एकमेकांशी संवाद साधण्यासाठी वापरल्या जाणार्या चॅनेलवर लक्ष ठेवते. संप्रेषणाचा मागोवा घेत असताना एजन्सीला असे आढळून आले की, काही मोबाईल अॅप्लिकेशन्स आहेत जे भारतातून ऑपरेट होत नाहीत आणि त्यांच्या हालचालींचा मागोवा घेणे कठीण आहे. यानंतर खोऱ्यात कार्यरत असलेल्या इतर गुप्तचर संस्थांच्या मदतीने अशा अॅप्सची यादी तयार करण्यात आली जे राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करू शकतात आणि त्यांनी भारतीय कायद्यांचे पालन केले नाही.
या अॅप्सला ब्लॉक केले गेले : यादी तयार झाल्यानंतर या मोबाइल अॅप्सवर बंदी घालण्याची विनंती मंत्रालयाला करण्यात आली होती. अधिकाऱ्याने सांगितले की, माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 च्या कलम 69 A अंतर्गत हे अॅप्स ब्लॉक करण्यात आले आहेत. सूत्रांनी सांगितले की या अॅप्समध्ये क्रायपवाइजर, इनिग्मा, सेफस्विस, विकरमे, मीडियाफायर, ब्रायर, बीचॅट, नंदबॉक्स, कॉनियन, आईएमओ, एलिमेंट, सेकेंड लाइन, जांगी, थ्रेमा या अॅप्सचा समावेश आहे.