सध्या महाभयंकर कोरोना विषाणू जगभरातील कोट्यवधी लोकांचा जीव घेत आहे. कोरोना विषाणू केवळ श्वसन प्रणालीवर हल्ला करतो, असे आपण मानत आलो आहोत. परंतु हा अंदाज बरोबर आहे का? कारण श्वसन प्रणालीसोबत कोरोना विषाणू डोळे, हृदय, यकृत, मेंदू आणि मूत्रपिंड यासारख्या इतर अवयवांवरही परिणाम करत आहे. लंडनमधील किंग्ज कॉलेज हॉस्पिटलमधील प्रोफेसर अजय शहा म्हणाले की, या विषाणूच्या प्रादुर्भावाचे प्रमाण आणि परिणाम हे पूर्वीच्या अनुमानांपेक्षा वेगळे आहेत. त्यांनी रूग्णालयात दाखल झालेल्या असंख्य कोरोना रुग्णांच्या लक्षणांची तपासणी केल्यानंतर ते या निष्कर्षापर्यंत पोहोचले आहेत. कोरोनाची लक्षणं न आढळणाऱ्या रुग्णांव्यतिरिक्त, कोरोनामुक्त झालेल्या बहुतांश रुग्णांमध्ये हा विषाणू पुन्हा नव्याने सापडला आहे. ‘द टेलीग्राफ’ने या संदर्भातील नवीन निष्कर्ष प्रकाशित केले आहेत.
कोरोना विषाणूंच्या कणांना आकर्षित करण्याची क्षमता नाकाच्या स्नायुत सर्वाधिक असते. सुरुवातीला हा कोरोना विषाणू काहीकाळ नाकपुड्यांमध्ये राहतो. या काळात रुग्णाची वास घेण्याची क्षमता गमावू शकते. त्यानंतर हा विषाणू हळूहळू अनुनासिक पोकळीतून घशात प्रवेश करतो. एसीई २ या स्नायूवर कोरोना विषाणू आपला निवास करतात; तसेच घशातील पातळ, चिकट पडद्यासारख्या त्वचेत घट्टपणे चिटकून बसतात. अशा त्वचेच्या पृष्ठभागावरील प्रथिने जेव्हा पेशींशी आपापसात क्रिया करत असतात तेव्हा हा विषाणूही या क्रियेत सहभागी होतो. आणि या विषाणूची पुनरावृत्ती होऊ लागते. या काळात रुग्णामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणं आढळत नाहीत. मात्र असा रुग्ण इतर निरोगी लोकांना संक्रमित करू शकतो. जेव्हा हा विषाणू घशात प्रवेश करतो तेव्हा जर आपली रोगप्रतिकार यंत्रणा या विषाणूचा प्रतिकार करण्यात अयशस्वी झाली तर हा विषाणू आपल्या फुफ्फुसांमध्ये प्रवेश करतो.
एकदा का हा विषाणू वायुमार्गाद्वारे पुढे सरकला, की त्या विषाणूचा स्फोट व्हायला लागतो. आणि हे विषाणूजन्य प्रथिने एसीई 2 रिसेप्टर्सद्वारे फुफ्फुसांच्या पेशींमध्ये जातात. त्यामुळे फुफ्फुसात जळजळ होते आणि श्वास घेण्यासही त्रास होतो. यामुळे ‘न्यूमोनिटिस’ (Pneumonitis) नावाची स्थिती उद्भवते. यामुळे श्वसन स्नायू सूजतात आणि त्याच वेळी फुफ्फुसांमध्ये एक प्रकारचा द्रव गोळा होतो. तर काही रुग्णांना तीव्र श्वसनाचा त्रास होतो ज्याला आपण ‘एआरडीएस’ (Acute Respiratory Distress Syndrome) म्हटले जाते. त्याचबरोबर रक्तातील ऑक्सिजनची पातळी धोकादायक पातळीपर्यंत कमी होते. या टप्प्यावर रुग्णाला व्हेंटिलेटरची आवश्यकता भासते. परंतु या टप्प्यावर विषाणूचा प्रसार आपण रोखू शकत नाही. त्यानंतर व्हेंटिलेटरने यांत्रिक श्वासोच्छ्वास देणे चालू ठेवून आपण केवळ रुग्णामध्ये रोगप्रतिकारक यंत्रणाद्वारे कोरोना विषाणूविरूद्ध लढण्याची वाट पाहू शकतो.
या अवस्थेत रुग्णाची रोगप्रतिकार यंत्रणा अतिरेकी पद्धतीने प्रतिसाद देते. त्याचबरोबर इम्यूनोग्लोबुलिन (Immunoglobulins) रुग्णांच्या पेशींवर हल्ला करते. अशा प्रकारचे निरिक्षण शास्त्रज्ञांच्या निदर्शनास आले आहे. या टप्प्यावर रुग्णाचे संपूर्ण शरीर फुगते आणि हृदयाचे ठोके वेगवान होतात. तसेच रक्तवाहिन्यांमध्ये जळजळ होते. सुमारे २० टक्के रुग्णांना मुत्रपिंडाचा त्रास होतो. तसेच शरिरात होणाऱ्या वेगवान हलचालीमुळे हृदयावर ताण निर्माण होतो. आयसीयूमध्ये असणाऱ्या रुग्णाचे एकापेक्षा जास्त अवयव निकामी होऊन मृत्यू होण्याची हीच कारणे आहेत.
“काही रूग्णांच्या निरीक्षणावरून लक्षात आले की, बरेच रुग्ण हॉस्पिटलमध्ये येताना गोंधळलेल्या अवस्थेत असतात किंवा काहीजण आत आल्यानंतर गोंधळात पडतात. मुळात ही लक्षणं मेंदूत काहीतरी गडबड असल्याची आहेत. विषाणूचा थेट मेंदूवर परिणाम होतो की नाही, किंवा रक्तातील ऑक्सिजन पातळी कमी झाल्याचं हे लक्षण आहे. याबद्दल काहीही खात्रीपूर्व सांगता येणार नाही.”
- डॉ. डंकन यंग, ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या इंटेंसिव्ह केअर मेडिसिनचे प्रोफेसर
हृदय आणि रक्तवाहिन्यांवरील कोविड-१९ विषाणूच्या परिणामाचा अभ्यास अद्याप बाकी आहे. पण रक्तवाहिन्याच्या पृष्ठभागावर या विषाणूने सातत्याने केलेल्या हल्ल्यामुळे छातीत जळजळ सुरु होते आणि परिणामी हृदय बंद पडते. ‘जामा कार्डियोलॉजी जर्नल’नुसार वुहानमधील ४१६ कोरोना बाधित रूग्णांवर अभ्यास करण्यात आला. या अभ्यासात असे दिसून आले की, ४१६ पैकी २० टक्के रुग्ण हृदय विकाराने मरण पावले आहेत. डॉक्टरांनी म्हटले आहे की, कोरोनाच्या गंभीर लक्षणासोबतच अशा रुग्णांना रक्तसंक्रमणाचे विविध आजार होते. म्हणूनच कोविड-१९ हा विषाणू मधुमेह आणि हृदयरोग असलेल्या रुग्णांसाठी प्राणघातक ठरत आहे. त्याचबरोबर डॉक्टरांच्या निदर्शनास असेही आले आहे, की कोरोना विषाणूची गंभीर लागण झालेल्या रूग्णांमध्ये ‘यकृत एंझाइम’ची टक्केवारी अत्यंत कमी असते.
म्हणजेच कोरोना विषाणू यकृताच्या कार्यप्रणालीवरदेखील परिणाम करतो. हा औषधोपचार किंवा रोगप्रतिकार यंत्रणेचा अतिरेकी प्रतिसादाचा परिणाम आहे कि नाही, यावर सध्या संशोधन सुरू आहे. मात्र वुहानमधील गंभीर लक्षणे असलेल्या ८५ कोरोना रूग्णांवर केलेल्या अभ्यासामध्ये २७ टक्के रुग्णांचे मूत्रपिंड निकामी झाल्याचे समोर आले आहे. मूत्रपिंडात कोरोना विषाणूला आकर्षित करणारे एसीई 2 रिसेप्टर्सचे प्रमाण मुबलक होते किंवा शरीराच्या अतिरेकी प्रतिसादामुळे रक्तदाब कमी झाला याबद्दल अजून डॉक्टरांनी कसलीही पुष्टी केली नाही. मात्र तिकडे जपानमधील एका रुग्णाला मेंदुज्वरची लक्षणे दिसून आली. डॉक्टरांनी त्याच्या सेरेब्रल फ्लुइडमध्ये म्हणजेच मेंदूत असलेल्या द्रव पदार्थामध्ये कोरोना विषाणूचे घटक सापडल्याचे सांगितले. हा महाभयंकर कोरोना विषाणू केंद्रीय मज्जासंस्थेतही प्रवेश करू शकतो, असाही संशय डॉक्टरांना आहे. अपस्मार (Epilepsy) आणि डोकेदुखी सारखी लक्षणे तर कोरोनाग्रस्त रूग्णांमध्ये सामान्य आहेत.
“आम्ही आजारपणाची एक रांग पहात आहोत; काही लोकांच्या रक्तामध्ये गुठळ्या निर्माण होतात, तर काहींना हृदयविकाराचा झटका किंवा मूत्रपिंड निकामी होते. अद्याप कोरोना विषाणूबद्दलची बरीच माहिती अज्ञात आहे. परंतु कोवीड-१९ च्या रूग्णांसोबत नेमके काय घडत आहे हे समजून घेण्यासाठी जे संशोधन प्रयत्न सुरू आहे ते पूर्णपणे अभूतपूर्व आहे.”
- प्रा. अजय शाह, सल्लागार कार्डिओलॉजिस्ट, किंग्ज कॉलेज हॉस्पिटल, लंडन.