लंडन : औषधनिर्मिती क्षेत्रातील अग्रेसर कंपनी 'ग्लॅक्सोस्मिथक्लाईन' म्हणजेच 'जीएसके'ने कोविड-१९ वर येणाऱ्या विविध लसींना सहकार्य करण्यासाठी, २०२१ मध्ये कोरोना विषाणूवरील लसीकरता सहाय्यक घटकाचे एक अब्ज डोस तयार करण्याची योजना असल्याचे सांगितले आहे. हा सहाय्यक घटक लसीचे कार्य अधिक प्रभावीपणे करण्यास मदत करतो.
मोठी जोखीम पत्करुन सहाय्यक घटकाचे उत्पादन सुरु केल्याचे कंपनीने सांगितले आहे. या सहाय्यक घटकाच्या उत्पादन आणि पुरवठ्यासाठी निधीकरिता सरकारे आणि जागतिक संस्थांबरोबर चर्चा सुरु होती, असेही कंपनीकडून सांगण्यात आले.
“आम्हाला खात्री आहे की, या जागतिक महामारीशी सामना करण्यासाठी एकापेक्षा अधिक लसींची गरज भासणार आहे आणि आम्ही आमच्या सहकाऱ्यांबरोबर यासाठी काम करीत आहोत”, असे रॉजर कॉनर यांनी एका निवेदनात सांगितले आहे. कॉनर हे जीएसके ग्लोबल व्हॅक्सिन्सचे अध्यक्ष आहेत.
“आमच्या अभिनव महामारी सहाय्यक तंत्रज्ञानात कोविड-१९ वरील विविध लसींमध्ये सुधारणा करण्याची तसेच त्यांचे प्रमाण वाढविण्याची क्षमता आहे, असा आम्हाला विश्वास आहे. आमच्या उत्पादन क्षमतेचा विस्तार करुन, आम्ही येत्या २०२१ पर्यंत सहाय्यक लसींचा पुरवठा करु शकतो. याद्वारे अधिकाधिक लोकांना मदत होईल आणि कोविड-१९ शी लढा देण्यासाठी सुरु असलेल्या जागतिक प्रयत्नांना पाठिंबा दिला जाईल”, असेही कॉनर पुढे म्हणाले.
जीएसकेने अनेक संस्थांबरोबर सहकार्य केले आहे. यामध्ये उत्तर अमेरिका, युरोप आणि चीनमधील वैज्ञानिक सहकाऱ्यांचादेखील समावेश असल्याचे कंपनीने सांगितले आहे. त्याचप्रमाणे, संभाव्य सहकाऱ्यांबरोबर आगामी सहकार्याबाबत चर्चा सुरु असल्याचेही सांगण्यात आले.
मागील फ्लू महामारीदरम्यान जीएसकेच्या महामारी सहाय्यकाने प्रत्येक डोसमागे लागणाऱ्या लस प्रथिन्यांचे प्रमाण कमी करण्याची क्षमता दर्शवली होती. यामुळे, लसीचा अधिक डोस निर्माण करण्यास सहाय्य होते आणि अधिकाधिक लोकांचे प्राण वाचण्यास मदत होते. याशिवाय, सहाय्यकामुळे रोगप्रतिकारक प्रतिसाद वाढीस लागण्यास मदत मिळते तसेच अधिक मजबूत आणि दीर्घकालीन रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होत असल्याचे दिसून आले आहे.
कंपनीच्या ज्या सहकारी संस्था व कंपन्या कोविड-१९ ची आश्वासक लस विकसित करीत आहेत, त्यांना हे महामारी सहाय्यक तंत्रज्ञान उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. उत्पादन क्षमतेत वाढ केल्यानंतर कंपनीच्या जागतिक पुरवठा नेटवर्कमध्ये त्याचा संपुर्ण आढावा घेतला जातो.
इंग्लंड, अमेरिका, कॅनडा आणि युरोपमधील प्रकल्पांमध्ये कोविड-19 च्या लसींसाठी वापरण्यात येणाऱ्या सहाय्यक लसींची निर्मिती व त्यासंदर्भातील कामकाज करण्यात येणार असल्याचे जीएसकेने सांगितले.
हेही वाचा : आय-मॅबच्या 'टीजेएम-२' मध्ये कोविड-१९च्या गंभीर रूग्णांवर उपचार करण्याची क्षमता : डीएमसी