भारताचे सर्वात पहिले सीडीएस, जनरल बिपीन रावत यांचे अपघाती निधन ( CDS General Bipin Rawat helicopter crash ) झाले. हवाई दलाच्या (Air Force) MI-17 V5 हेलिकॉप्टरमधून लष्कराच्या तळावर जात असताना निलगिरीच्या घनदाट जंगलात त्यांचा अपघात झाला. हेलिकॉप्टर लँड होण्यापूर्वी काही मिनिटे आधी हा अपघात झाला. यामध्ये जनरल रावत यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि इतर ११ अधिकारी अशा एकूण १३ जणांचा मृत्यू झाला. त्याचबरोबर या अपघातात एक अधिकारी बचावले आहेत. त्यांचे नाव आहे ग्रुप कॅप्टन वरुन सिंह. त्यांचीही मृत्यूशी झुंज सुरू आहे.
या अपघातानंतर त्यासंदर्भातील चौकशीच्या सूचना देण्यात आल्या. अतिशय शास्त्रोक्तपद्धतीने या अपघाताची काटेकोरपणे चौकशी होईल. त्यातून काही निष्कर्ष काढले जातील. सर्वच प्रकारच्या तांत्रिक बाबी तपासण्यात येतील. मात्र या अपघातानंतर भारतीय सुरक्षा यंत्रणा आणि त्यातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची सुरक्षा यावर सर्वच माध्यमांच्यामधून विविधांगी चर्चा झाल्या. त्यातून अनेक मतप्रवाह दिसून आले. अगदी मानवी चुकीपासून तांत्रिक तसेच अचानक होणारा हवामानबदल असे काही महत्वाचे मुद्दे यावेळी मांडण्यात आले. काही ठिकाणी तर यामध्ये काहीतरी काळेबेरे असेल का, याचीही शंका उपस्थित करण्यात आली. कुणीतरी घातपात केला असण्याच्या शंकेलाही वाव आहे, असे काही जणांनी आवर्जून सांगितले. तपासाअंती यासंदर्भातील वस्तुनिष्ठ माहिती समोर येईलच. त्याची वाट पाहिली पाहिजे.
यापूर्वी झालेल्या अपघातांच्यामध्ये त्यांच्या चौकशीचे निष्कर्ष पाहिल्यावर परिस्थितीजन्य पुरावा आणि प्रत्यक्ष घटना यांची इत्थ्यंभूत माहिती घेऊन त्यांचा तपशीलवार अभ्यास करण्यात आल्याचे स्पष्ट होते. त्यातून सर्वच प्रकारची वस्तुनिष्ठ माहिती मिळते. त्यावरुन काही स्पष्ट निष्कर्ष काढले जातात. ते योग्य आणि बरोबरही असतात. त्यावर काही शंका घेण्याचे कारण नाही. कारण त्यामध्ये मिनीटामिनीटाच्या घडामोडींचा आढावा घेऊन, त्या सगळ्याचा शास्त्रोक्त पद्धतीने ताळमेळ घालून या अपघाताची कारणमिमांसा केली जाते. मात्र तिन्ही दलातील सर्वोच्च अधिकाऱ्याचा या घटनेमध्ये मृत्यू झाल्याने, त्यातील सर्वच माहिती सार्वजनिक केली जाईल असेही नाही. राष्ट्रहिताच्या दृष्टीने ते योग्यही आहे. तरीही अशा प्रकारचे अपघात भविष्यात टाळण्यासाठी यातून धडा घेणे अधिक गरजेचे ठरते.
या अपघातानंतर हा घातपात असण्याची शक्यता अनेकांनी वर्तवली आहे. काही निवृत्त अधिकाऱ्यांपासून लोकप्रिय नेत्यांपर्यंत अनेकांनी याबाबत आपली मते मांडली आहेत. हवाईदलाच्या अत्यंत सुसज्ज आणि सर्वचप्रकारच्या हवामान आणि भौगोलिक परिस्थितीत आकाशात संचार करणारे हेलिकॉप्टर पडल्याने या शंकेलाही वाव आहे. त्यातही अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या सेवेत असणारी अशी हेलिकॉप्टर तसेच विमाने अधिक काळजीपूर्वक तपासणी करुनच सेवा बजवत असतात. वेळोवेळी अत्यंत निष्णात असे अधिकारी अभियंते तसेच कर्मचारी त्याची चाचणी तसेच तपासणी करत असतात. तरीही असा जेव्हा अपघात होतो. त्यावेळी घातपाताच्या शक्यतेची पाल चुकचुकणे साहजिकच आहे. त्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. मात्र या गोष्टी तपासाच्या आहेत. त्यानंतरच काय ते स्पष्ट होईल.
तांत्रिक गोष्टींचा विचार नेहमीच अपघातांच्या बाबतीत केला जातो. त्याचा तपशीलही मिळू शकतो. त्याचबरोबर मानवी चुकांविषयीही माहिती घेण्यात येते. त्यानंतर नेमका कशामुळे अपघात झाला असेल याचा अंदाज बांधला जातो. त्यानंतर सर्वच, गोष्टींची खातरजमा झाल्यावर अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला यावर शिक्कामोर्तब करण्यात येते. यामध्ये मानवी चुकीच्या कारणांचा विचार केल्यास ऑपरेशन किंवा प्रत्यक्ष तांत्रिक नियंत्रणात संबंधित व्यक्तीची चूक झाल्याचा तपशील पाहण्यात येतो. मात्र यामध्ये एक गोष्ट लपून राहण्याची शक्यता अधिक असते. ती म्हणजे काही गोष्टींकडे केलेले दुर्लक्ष.
अनेकवेळा अतिमहत्वाच्या व्यक्तीं किंवा नेते किंवा अधिकारी त्यांना कल्पना देऊनही काही जोखीम घेण्याचे आदेश त्यांच्या कनिष्ठांना देतात. अशावेळी संबंधित कनिष्ठांनी निदर्शनास आणून दिलेल्या धोक्याची कल्पना तपास अधिकाऱ्यांना येतेच असे नाही. कारण अशा गोष्टींची नोंद कुठेही नसते. ज्या गोष्टीचे रेकॉर्डच नाही त्याचा समावेश तपासामध्ये होतोच असे नाही. हेच कच्चे दुवे बहुतांशवेळा अशा अपघातांना कारणीभूत असतात असा अनुभव काही जणांनी सांगितला आहे. अधिकारी आणि अतिमहत्वाच्या व्यक्तींचे आदेश तसेच सूचना या संबंधित कर्मचारी तसेच कनिष्ठांना मोडता येत नाहीत. नेमके हेच कारण अशा अपघातांना निमंत्रण देऊ शकते. मात्र एखादी धोक्याची सूचना मिळाल्यानंतर त्याचे गांभिर्य ओळखून काही गोष्टी लांबणीवर टाकणे किंवा रद्द करणे योग्य ठरते.
जनरल बिपीन रावत यांच्या अपघाताने देशाची अपरिमीत हानी झाली आहे. भारतासारख्या खंडप्राय आणि प्रगतीपथावरील देशाला ही हानी परवडणारी नाही. त्यामुळे या अपघाताच्या मुळाशी जाऊन यापुढे अशी दुर्घटना होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल. हीच यानिमित्ताने अपेक्षा.
अभ्युदय रेळेकर, aprelekar@gmail.com