नवी दिल्ली - कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर एड्सबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी आरोग्य सेवा पूर्ववत करून औषध पुरवठा सुरळीत करण्यासाठी येणाऱ्या अडचणींवर मात केली नाही तर एड्सबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होऊ शकते, असे जागतिक आरोग्य संघटना आणि यूएएनएडीएसच्या (UNAIDS) संयुक्त विद्यमाने नियुक्त केलेल्या तज्ज्ञांच्या गटाने म्हटले आहे. एड्सबाधित रुग्णांना देण्यात येणाऱ्या 'अँटीरेट्रोव्हायरल' थेरपीमध्ये सहा महिन्यांपेक्षा जास्त व्यत्यय आल्यास एड्स संबंधित आजारामुळे ५ लाखांपेक्षा जास्त मृत्यू होऊ शकतात, असे या गटाने म्हटले आहे.
एड्स संबंधित आजारामुळे आफ्रिकेत ५ लाखांपेक्षा जास्त मृत्यू होण्याची भीती निर्माण झाली आहे. असे झाल्यास आपण अनेक दशके मागे जाऊ ,असे जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ टेड्रॉस अॅडहॅनॉम घेब्रीयसस यांनी म्हटले आहे.
“याकडे आपण भविष्यातील संकटाची चाहूल देणारी धोक्याची सूचना म्हणून पहिले पाहिजे आणि प्रत्येक देशांनी महत्त्वाच्या आरोग्य सेवा टिकवून ठेवण्याचे मार्ग अवलंबले पाहिजेत. एचआयव्ही प्रतिबंधासाठी काही देशांनी अगोदरच पावले उचलायला सुरुवात केली आहे. उदा. आरोग्य सेवा आणि आरोग्य कर्मचार्यांवर अचानक वाढणारा ताण टाळण्यासाठी 'ड्रॉप-ऑफ पॉईंट्स'मधून लोकांना स्वतः मोठ्या प्रमाणात उपचार आवश्यक साधने, टेस्टिंग किटसह इतर वस्तू घेता येतील याची सोय करण्यात आली आहे. त्याचबरोबर ज्या देशांना जागतिक स्तरावरून चाचण्या व उपचारांचा पुरवठा होत आहे तो अविरत सुरू राहील याची काळजी घेणे आवश्यक आहे,”असे डॉ. टेड्रोस म्हणाले.
सहारा उपखंडातील आफ्रिकेतील देशांमध्ये, २०१८ अखेर अंदाजे २.५७ कोटी लोक एचआयव्हीबाधित आहेत तर त्यापैकी १.६४ कोटी लोक (६४ टक्के) 'अँटीरेट्रोव्हायरल' थेरपी घेत होते. मात्र जगभरातील आरोग्य सेवा कोविड १९च्या प्रादुर्भावाकडे केंद्रित झाल्याने आणि जगभरातील पुरवठा साखळी प्रभावित झाल्याने या लोकांना मिळणारे एचआयव्ही उपचार बंद झाले आहेत तर अँटीरेट्रोव्हायरल थेरपी खंडित झाली आहे असे डॉ. टेड्रॉस यांनी स्पष्ट केले.
त्यांनी पुढील धोका स्पष्ट करताना म्हटले आहे की, जर या उपचार सेवांमध्ये खंड कायम राहिल्यास आईपासून मुलाकडे होणारे एचआयव्ही संक्रमण रोखण्यास जे यश मिळाले होते ते सर्व व्यर्थ जाईल. २०१० पासून सहारा उपखंडातील आफ्रिकन देशांमध्ये मुलांना होणारे एचआयव्ही संक्रमण ४३ टक्क्यांनी खाली आले आहे. २०१० मध्ये २ लाख ५० हजार मुलांना संक्रमण झाले होते ते २०१८ मध्ये १ लाख ४० हजारांवर आले आहे. एचआयव्हीग्रस्त माता आणि त्यांच्या मुलांना दिलेल्या आरोग्य सेवांमुळे हे शक्य झाले आहे. दरम्यान आता कोविड १९मुळे ही आरोग्य सेवा ६ महिन्यांपर्यंत खंडित झाल्यास किंवा त्यात व्यत्यय आल्यास नव्याने होणाऱ्या मुलांना एचआयव्ही संक्रमणात मोठी वाढ होऊ शकते. त्यापैकी मोझांबिक देशात 37 टक्के, मलावीमध्ये 78 टक्के , झिम्बाब्वेमध्ये 78 टक्के आणि युगांडामध्ये १०४ टक्क्यांची वाढ होऊ शकते.