हैदराबाद - कोरोना विषाणूच्या संसर्गाचे रुपांतर जगावरील संकटात झाल्याने स्थलांतरित कामगारांवर त्याचा व्यापक परिणाम होणार आहे. लोकांच्या हालचालींवर, प्रवासावर निर्बंध लादले गेले असले तरी हिंसा, मानवी हक्कांचे उल्लंघन यांसारख्या घटनांमध्ये कमी आलेली नाही.
यूनायटेड नेशन्स ऑफिस ऑन ड्रग्स अँड क्राइमच्या (यूएनओडीसी) म्हणण्यानुसार, कोविड-१९मुळे मोठे आर्थिक संकट कोसळल्याने प्रभावित झालेल्या देशांमधून तुलनेने श्रीमंत देशांमध्ये होणाऱ्या बेकायदेशीर हालचाली आणि मानवी तस्करीच्या घटनांमध्ये वाढ होऊ शकते. महामारीमुळे स्थलांतरित, निर्वासितांच्या मार्गावर असलेल्या आणि निर्वासित छावण्यांमध्ये राहणाऱ्यांचे आयुष्य धोक्यात आले आहे.
भूमध्य प्रदेश, सहार उपखंडातील आफ्रिकन देश, मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिकन आणि आशियाई प्रदेशात कामगारांचे स्थलांतरित होण्याचे प्रमाण जास्त आहे. मात्र, समुद्रावर चालणारी शोधमोहीम आणि बचाव कार्यात घट झाल्याने कोविड-१९च्या संक्रमणाचा धोका वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, निर्बंध आणि बंदीमुळे तस्करी सेवांच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे. तर दुसरीकडे निर्बंधांमुळे तस्करीसाठी अधिक धोकादायक मार्ग अवलंबले जात असल्याने स्थलांतरितांना नवीन समस्यांना सामोरे जावे लागत आहे. जागतिक आर्थिक संकटामुळे बेरोजगारीच्या दरात वाढ होईल यामुळे नोकरीच्या संकटाचा सामना करणाऱ्यांचे देशांच्या सीमा ओलांडून होणाऱ्या तस्करीमध्ये वाढ होईल.
जीवघेण्या कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी राबविण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक देशांमध्ये बेरोजगारी आणि दारिद्र्याचे प्रमाण वाढेल. यामुळे या लोकांना लक्ष्य करण्याच्या तस्करांच्या संख्येत वाढ होईल. यूएनओडीसीच्या संशोधनात असे म्हटले गेले आहे की, उद्भवलेल्या आर्थिक संकटातून मार्ग काढत बाहेर पडण्याचे प्रमाण असमान असणार आहे. त्यामुळे आर्थिक दृष्टिकोनातून चांगले जीवन जगण्यासाठी परकीय देशांमध्ये गेलेल्या लोकांचे/कामगारांचे मोठ्या प्रमाणात शोषण होईल.
आर्थिक मंदी आणि कोरोना विषाणूच्या लॉकडाऊनमुळे स्थलांतरितांच्या बेकायदेशीर हालचाली आणि व्यक्तींच्या तस्करींमध्ये होणारी वाढ गंभीर असू शकते. तथापि, विकसित आणि विकसनशील अशा दोन्ही देशांनी अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी गुंतवणूक वाढविल्यास स्थलांतरितांची तस्करी टाळता येऊ शकते.
शरणार्थी आणि स्थलांतरितांना सुरक्षित प्रवास उपलब्ध करून दिल्यास त्यांना तस्करीपासून वाचविणे सहज शक्य आहे.