हैदराबाद - कोविड-१९ महामारीमुळे सरासरी १२ आठवड्यांसाठी आरोग्य सेवा मोठ्या प्रमाणात प्रभावित होत असल्याने या कालावधीत नियोजित असलेल्या किंवा होऊ घातलेल्या तब्बल २.८४ कोटी वैकल्पिक (रुग्णांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण परंतु रुग्ण प्रतीक्षा करू शकतील ) शस्त्रक्रिया रद्द होण्याची किंवा पुढे ढकलण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत असे एका अभ्यासात आढळून आले आहे.
ब्रिटिश जर्नल ऑफ सर्जरीमध्ये प्रसिद्ध झालेल्या मॉडेलिंग अभ्यासानुसार (आरोग्य क्षेत्रात निर्णय राबविण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या एक अभ्यासानुसार), १२ आठवड्यांपेक्षा जास्त काळासाठी आरोग्य सेवा विस्कळीत झाली तर जागतिक पातळीवर प्रत्येक आठवड्याला रद्द होणाऱ्या शस्त्रक्रियांची संख्या २४ लाखांनी वाढणार आहे.
संशोधकांचा असा अंदाज आहे की, एकूण रद्द होणाऱ्या शस्त्रक्रियांमध्ये ७२.३ टक्के शस्त्रक्रिया या नियोजित स्वरूपातील असतील. यापैकी कर्करोग व्यतिरिक्त इतर शस्त्रक्रियांची संख्या सर्वाधिक असेल. त्यातही ऑर्थोपेडिक शस्त्रक्रिया बहुतेक वेळा रद्द केल्या जातील. १२ आठवड्यांच्या कालावधीत जगभरात एकूण ६३ लाख ऑर्थोपेडिक शस्त्रक्रिया रद्द केल्या जाण्याची शक्यता अधिक आहे. त्याचवेळी साधारणतः २३ लाख कर्करोगाशी संबंधित शस्त्रक्रिया रद्द किंवा पुढे ढकलल्या जातील असा अंदाज आहे.
“कोविड-१९चा इतर रुग्णांना होणारा संभाव्य धोका लक्षात घेऊन आणि कोविड-१९च्या रुग्णांसाठी रुग्णालयातील अनेक ऑपरेटिंग थिएटर्सचे रूपांतर आयसीयू (इन्टेन्सिव्ह केअर युनिट) मध्ये केल्याने वैकल्पिक शस्त्रक्रिया रद्द करण्यात येत असल्याचे बर्मिंघम युनिव्हर्सिटीच्या ग्लोबल सर्जरी विषयक एनआयआर ग्लोबल हेल्थ रिसर्च युनिटचे सल्लागार सर्जन आणि वरिष्ठ व्याख्याते श्री अनील भांगू यांनी म्हटले आहे.
बर्मिंघम युनिव्हर्सिटीच्या ग्लोबल सर्जरी विषयक एनआयआर ग्लोबल हेल्थ रिसर्च युनिटच्या रिसर्च फेलो डॉ दिमित्री नेपोगोडीएव्ह यांच्या म्हणण्यानुसार: “रुग्णालयातील सेवा विस्कळीत होण्याचे प्रमाण एका आठवडयांनी जरी वाढले तरी प्रत्येक आठवड्याला अतिरिक्त ४३ हजार ३०० या प्रमाणात शस्त्रक्रिया रद्द केल्या जातील त्यामुळे रुग्णालयांनी आपल्या सेवा क्षमतेचे नियमितपणे मूल्यांकन करणे महत्वाचे आहे. जेणेकरून लवकरात लवकर वैकल्पिक शस्त्रक्रिया सुरु होतील."