जगभरातील जवळपास सर्वच देशांमध्ये कोरोनाने अतिशय क्रूरपणे हल्ला सुरूच ठेवला आहे. कोरोनाच्या स्वरूपात जगासमोर एक मोठी आपत्ती उभी ठाकली असून आतापर्यंत सुमारे 40 लाख लोक बाधित झाले आहेत तर, २ लाख ७३ हजार जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यात अमेरिका, युके, इटली आणि स्पेन या देशांना सर्वात मोठा फटका बसला आहे. तर, ५६ हजारांपेक्षा जास्त बाधित रुग्ण आणि १ हजार ९०० पेक्षा जास्त मृत्यू झालेल्या भारतात देखील चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. जगभरातील सुमारे ९० हजारांपेक्षा जास्त आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी देखील कोरोनाने प्रभावित झाले आहेत. त्यामुळे कोरोनाला अटकाव करू शकेल अशा लसीची संपूर्ण जग प्रतीक्षा करत आहे.
भारतासह अनेक देशांमध्ये विविध प्रकारच्या विषाणूंचा अभ्यास करण्यासाठी आणि त्यांच्या अनुवांशिक गुणधर्माचे विश्लेषण करण्यासाठी मूलभूत सुविधा उपलब्ध आहेत. मात्र असे अनेक विषाणू आहेत ज्यांवर आतापर्यंत कोणतीही लस सापडलेली नाही. महत्त्वाचे म्हणजे कोरोना विषाणूचे विश्लेषण करून त्याच्यावर लस शोधणे सोपे नसल्याचे शास्त्रज्ञांनी वेळोवेळी सांगितले आहे. कोरोना विषाणूमधील जिकिरीची गुंतागुंत संशोधकांसमोर एक गंभीर आव्हान बनले आहे. यामुळे शास्त्रज्ञांच्या चिकाटी आणि निश्चयाची खरी कसोटी लागली आहे. ७ जानेवारी रोजी पहिल्यांदा चीनने कोरोनाच्या गुंतसूत्रांची माहिती जाहीर केली होती. त्यानंतर आतापर्यंत अनेक वैद्यकीय व औषधी कंपन्यांनी सुमारे सहा हजार शोधनिबंध प्रकाशित केले आहेत. संपूर्ण जग कोरोनावरील रामबाण औषधाची उत्सुकतेने प्रतीक्षा करत असताना शोधनिबंध किंवा इतर अंदाजांमधून प्रकाशित होणारे निष्कर्ष सुखावणारे ठरत आहेत. हे निष्कर्ष कोरोनामुळे त्रस्त असलेल्या जगाला अंधारामध्ये एक आशेचा किरण दाखवत आहेत.
गुणवत्तापूर्ण संशोधन आणि सातत्याने नाविन्यपूर्ण शोध लावणारे इस्रायल लवकरच कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी एक नवीन उपचार पद्धती घेऊन येत आहे. कोरोनाचा समूळ नाश करणाऱ्या अँटीबॉडीजचे व्यावसायिक पातळीवर उत्पादन सुरु झाल्यास ते कोरोनाच्या लढाईतील मोठे पाऊल ठरेल. चिंपांझींमधील विषाणूच्या साह्याने तयार केलेल्या लसीचे औषधीय प्रयोग यशस्वी झाले असल्याचे प्रतिष्ठित ऑक्सफोर्ड विद्यापीठाने म्हटले आहे. भारतात देखील ३० लसींची वेगवेगळ्या पातळीवर पडताळणी सुरु असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. इबोलाच्या उपचारात 'रेमेडेसिवीर बरोबर वापरली गेलेली चार प्रकारची औषधे देखील कोरोनाशी लढा देण्यास सक्षम असल्याचे समोर आले आहे.
या अगोदर देखील जगात हाहाकार माजविणाऱ्या प्लेग, गोवर, चिकनपॉक्स, पोलिओ सारख्या भयानक साथीच्या रोगांवर लसींच्या माध्यमातून यश मिळविण्यात आले आहे. तज्ज्ञांच्या मते पुढील काही महिन्यात कोरोनावरील लस विकसित होईल. त्यानंतर काहीच महिन्यात जगभरातील ७८० अब्ज लोकसंख्येपैकी ५० ते ७० टक्के लोकांना ही लस देण्यात येईल. मोठ्या प्रमाणात या लसीचे डोस तयार करणे हे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील नामांकित फार्मास्युटिकल कंपन्यांसमोरचे मोठे आव्हान आहे. ज्यावेळी ही लस विकसित होईल त्यावेळी जगातील सर्व राष्ट्रांनी एकमताने एकत्र येऊन सर्वांना परवडणाऱ्या दरात ही लस उपलब्ध करुन दिली पाहिजे. एकत्रित सामर्थ्यानेच कोरोनाला नियंत्रणात आणून त्याचा समूळ नाश करणे शक्य होईल.
हेही वाचा : कोरोनावरील लस शोधण्यासाठी 'भारत बायोटेक' घेणार पुढाकार..