मुंबई - बनावट नोटांचा काळाबाजार रोखण्यासाठी केंद्राकडून काही वर्षांपूर्वी नोटाबंदी करण्यात आली होती. यात चलनात असलेल्या १ हजार आणि ५०० रुपयांच्या नोटांचा समावेश होता. यानंतर व्यवहाराठी नव्या नोटा चलनात आणल्या. मात्र, या नव्या नोटांचीही हुबेहूब नक्कल असलेल्या बनावट नोटा पुन्हा चलनात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशाच प्रकारे दोन हजारांच्या बनावट नोटा विकण्यासाठी आलेल्या दोन आरोपींना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.
मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचच्या युनिट ३ ने केलेल्या कारवाईत भायखळा परिसरात एकूण ६४ हजार रुपये किमतीच्या २ हजाराच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.
झारखंड राज्यातून हे दोन आरोपी मुंबईत बनावट नोटा घेऊन दाखल झाले होते. मोहम्मद शेख आणि अब्दुल शेख अशी दोन अटक आरोपींची नावे असून, झारखंड मध्ये या नकली नोटा छपाई करत असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या दोन्ही आरोपींकडून बनावट नोटा छपाई करण्यासाठी लागणारा कागद व मशीन ताब्यात घेतली आहे. बनावट नोटा बनविणाऱ्या टोळीत अजून कोणाचा सहभाग आहे का? याचा तपास क्राईम ब्रँच चे अधिकारी करीत आहेत. यासंदर्भात जगदीश साहिल, पोलीस निरीक्षक, मुंबई क्राईम ब्रँच युनिट ३ यांनी माहिती दिली.