कन्नड(औरंगाबाद ) - तालुक्यातील शिरेसायगावात शुक्रवारी पहाटेच्या सुमारास दरोडा पडल्याची घटना घडली. पाच सहा दरोडेखोरांनी शिरसगावातील तीन नागरिकांना जखमी करून रोखरक्कम, सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह पंचवीस हजाराचा मुद्देमाल लंपास केला आहे. या प्रकरणी दरोडेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कन्नड तालुक्यातील शिरेसायगाव येथील संपत बाबुराव जगताप यांच्या शेतवस्तीवर शुक्रवारी पहाटे दोन वाजताच्या सुमारास दरोडा पडला. जगताप कुटुंब साखरझोपेत असताना पाच ते सहा दरोडेखोरांनी हल्ला चढवला. या हल्ल्यात प्रमिला सुंदर जगताप यांच्या कानातील कर्णफुले चोरण्याच्या प्रयत्नात दरोडेखोरांनी तिचा कानच तोडला आहे. तर आणखी दोघांना त्यांनी काठ्यांनी मारहाण केली. घरातील नागरिकांना मारहाण होत असल्याचे पाहून भीतीपोटी महिलांनी आपल्या अंगावरचे दागिने काढून दिले. तसेच रोख दहा हजार रुपये असा एकूण पंचवीस हजाराचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला.
या प्रकरणी शिल्लेगाव पोलीस ठाण्यात संजय जगताप यांच्या तक्रारीवरून अज्ञात दरोडेखोरांविरुद्ध भादंवि कलम 394,461,452 गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दरोड्याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.