नांदेड - शहरातील गुरूकृपा ज्वेलर्समध्ये अज्ञात दरोडेखोरांनी शुक्रवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास धाडसी दरोडा टाकला. या दरोड्यात अज्ञात आरोपींनी व्यापारी रविंद्र चक्रवार यांना कैचीने भोकसले. यात रविंद्र यांचा मृत्यू झाला. दरम्यान या घटनेत दरोडेखोरांनी दुकानातील लाखो रुपयांचे दागिने पळवले आहेत. या घटनेने सराफा बाजारासह नांदेड शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरोडेखोरांनी व्यापारी रविंद्र यांच्यावर कैचीने हल्ला केला. त्यात रविंद्र हे गंभीर जखमी झाले. हे पाहून दरोडेखोर दुकानातील सोन्या-चांदीचे दागिने लुटून पसार झाले. महत्वाचे म्हणजे चोरट्यानी दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे फोडून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. रात्री शहरात जोरदार पाऊस सुरू होता, त्या दरम्यान अज्ञात दरोडेखोरांनी हे कृत्य केले.
विशेष म्हणजे घटना घडल्यानंतरही बराच वेळ याबाबत कुणालाच काही समजले नसल्याचे समजते. वडिलांना घरी यायला नेहमीपेक्षा उशीर झाल्याने मुलाने मोबाईलवर फोन करून पाहिले. पण रविंद्र चक्रवार यांनी फोन उचलला नाही. त्यामुळे मुलाने दुकान गाठले, तर ते रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले.
घटना उघडकीस यायला बराच वेळ लागला, यातच रविंद्र चक्रवार यांचा जीव गेला. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करत पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान दरोडेखोर फरार झाले होते. हत्या आणि लुटीच्या या घटनेमुळे नांदेडमध्ये व्यापारी वर्गात दहशत पसरली आहे. या घटनेचा अधिक तपास इतवारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक काकडे करीत आहेत.
हेही वाचा - नांदेड जिल्ह्यात अशोक चव्हाणांनी गड राखला, तर शिवसेनेची पिछेहाट...!
हेही वाचा - नायगाव मतदारसंघात काँग्रेसची हॅट्रीक हुकली, भाजपचे राजेश पवार मोठ्या मताधिक्याने विजयी....!