सातारा : जिल्ह्याच्या माण तालुक्यातील दहिवडी पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकावर पोक्सो अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली. तर दुसरीकडे वडगाव येथे फोटो व्हायरल करायची धमकी देऊन वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहितीनुसार, १५ जुलैरोजी सकाळी पावणे बाराच्या सुमारास अल्पवयीन मुलगी ही तिच्या घरातील हॉलमध्ये बसली होती. त्यावेळी आरोपी हा अल्पवयीन मुलीच्या घरात आला व घरातील टीव्ही लावून सोफासेटवर बसला. यानंतर, अचानक तो स्वयंपाक खोली व हॉलच्या मध्यभागी असलेला दरवाजा ढकलून मुलीजवळ गेला. त्यानंतर तिचे तोंड डाव्या हाताने दाबून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मुलीने आरडाओरडा केल्याने आरोपी पळून गेला. याबाबत मुलीच्या आईने दहिवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ करत आहेत.
तर, दुसरा गुन्हा दहिवडीमधील वडगाव येथे घडला आहे. यात आरोपी अशोक विलास ओंबसे रा. वडगाव याने एक महिलेला फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार अत्याचार केला. याप्रकरणी आरोपी अशोक विलास ओंबसे याच्यावर दहिवडी पोलीस ठाण्यात विविध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रमोद दीक्षित करत आहेत.