धुळे - शिरपूर तालुक्यातील उमर्दा येथे एका शेतात टाकलेल्या छाप्यात १४ लाख रुपयांचा ओला गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. तसेच, कापसाच्या शेतात सुरू असलेली गांजाची शेती पोलिसांनी उदध्वस्त केली आहे. या प्रकरणी ३ संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
उमर्दा येथे एका शेतात अवैधरित्या गांजाची लागवड केली जात असल्याची गुप्त माहिती शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे एपीआय अभिषेक पाटील यांना मिळाली होती. या माहितीवरून एपीआय पाटील यांचे एक पोलीस पथक व आरसीपीच्या पथकाने उमरदा गाव शिवारातील आपसिंग दित्या गुलवणे याच्या शेतात छापा टाकला.
गुलवणे याने कपाशीच्या शेतात गांजाची लागवड केल्याचे पथकाला दिसून आले. पथकाने कारवाईत चार ते सहा फूट उंचीची सातशे चार किलो वजनाची गांजाची झाडे जप्त केली आहेत. जप्त केलेल्या गांज्याची किंमत १४ लाख ८ हजार इतकी आहे. याप्रकरणी पथकाने शेतमालक आपसिंग गुलवणे व त्याचे साथीदार कुवरसिंग मगर वळवी आणि सुनील बाबूलाल वळवी यांना ताब्यात घेतले आहे. पथकाने गांजाची झाडे मुळासकट उपटून काढली. मात्र, काही झाडे उपटणे अशक्य असल्याने ती कापण्यात आली. त्यानंतर त्याचे गठ्ठे तयार करून वजन करण्यात आले.
हेही वाचा - शिक्षकांनी उडवला सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा; धुळ्यातील घटना