वर्धा - शहरातील तारफैल परिसरात सात ते आठ वर्षीय बालकाचा मृतदेह पाण्याच्या टाकीत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर सायंकाळी शहर पोलीस ठाण्याच्या आवारात मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने तणाव निर्माण झाला. या प्रकरणात आरोपी विरुद्ध अनैसर्गिक कृत्य करून हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहराच्या तारफैल परिसरात पाण्याच्या टाकीत अर्धनग्न अवस्थेत या बालकाचा मृतदेह आढळून आल्याने संतापलेल्या नागरिकांनी 26 वर्षीय तरुणास बेदम मारहाण केली. यावर संतप्त नागरिकांचा 400 लोकांचा जमाव शहर पोलीस ठाण्यावर चालून गेला. यावेळी आरोपीला आमच्याकडे द्या, त्याला कठोर शिक्षा द्या अशी मागणी जमावाने केली. यावेळी वातावरण तापल्याने अधिकची कुमक तैनात करण्यात आली. प्रकरणाची गंभीरता पाहता पोलीस अधीक्षक डॉ बसवराज तेली यांनी घटनास्थळी भेट देऊन अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात.
आरोपी हा त्याच परिसरातील...
आरोपी हा पीडित चिमुकल्याचा शेजारी आहे. त्याने चिमुकल्याला एका खोलीत उचलून नेत त्याच्यावर अनैसर्गिक कृत्य केले. यावेळी त्याने आरडाओरडा केल्याने त्याची हत्या करत त्या चिमुकल्याला पाण्याच्या टाकीत टाकून दिल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे. या प्रकरणात कलम 302 हत्या, 377 अनैसर्गिक कृत्य, 342 उचलून नेने, भादविसह बाल लैंगिक अत्याचार कायद्यांतर्गत कलम 4 पोस्कोनुसार गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती ठाणेदार योगेश पारधी यांनी दिली. आरोपीवर उपचार सुरू असून तो पोलिसांच्या ताब्यात आहे.
गृहमंत्री जिल्ह्याच्या दौऱ्यावर.....
महाराष्ट्राचे गृहमंत्री हे अनिल देशमुख हे आज कोविड 19 अंतर्गत शनिवारी बैठक घेण्यासाठी जिल्ह्याच्या दौऱयावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या पूर्वसंध्येला ही धक्कादायक घटना घडली आहे. त्या अनुषंगाने पोलीस यंत्रणा सुद्धा या याप्रकरणात सतर्कतेने पाऊले उचलताना दिसून आली आहे.