लंडन - जगभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले असून परिस्थिती आणखी गंभीर होत चालली आहे. जगभरामध्ये कोरोनावर लस तयार करण्यासाठी काम सुरू आहे. यातच एक दिलासादायक बातमी समोर आली आहे की, कोरोनावरील लसीचे जवळजवळ 2 अब्ज एवढे डोस पुढील वर्षाच्या अखेरीस तयार होतील. जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) मुख्य वैज्ञानिक असलेल्या डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी याबाबतची माहिती दिली.
याक्षणी आमच्याकडे कोरोनाला मुळातून संपवणारी लस नाही. मात्र, या वर्षाच्या अखेरीस लस तयार होईल आणि पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत 2 अब्ज डोस मिळतील, असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
शास्त्रज्ञ कोरोनाविरूद्ध सुरक्षित आणि प्रभावी लस देण्याचा प्रयत्न करत आहेत. ते तयार होण्यास कमीत कमी 12 ते 18 महिने लागू शकतात. दरम्यान गेल्या महिन्यात, जागतिक औषधी कंपनी फिझरने म्हटले होते की, कोरोनाला रोखण्यासाठीची लस ऑक्टोबरच्या अखेरीस तयार होऊ शकेल. चाचण्यांच्या विविध टप्प्यात सध्या 100 पेक्षा जास्त लस चाचण्यांच्या विविध टप्प्यात आहेत.