लंडन - भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांनी किंग चार्ल्स यांची भेट घेतील. त्यानंतर त्यांची रितसर ब्रिटनचे पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली. ते भारतीय वंशाचे ब्रिटनचे पहिले पंतप्रधान झाले आहेत. त्यानंतर त्यांनी राष्ट्राला उद्देशून पहिले भाषण केले.
सुनक यांनी कालच, युनायटेड किंगडम हा एक महान देश आहे. परंतु आमच्यासमोर एक गहन आर्थिक आव्हान आहे यात शंका नाही, असे स्पष्ट शब्दात सांगितले होते. पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर सुनक यांनी त्यांच्या पहिल्या सार्वजनिक निवेदनात ही गोष्ट स्पष्ट केली. आम्हाला आता स्थिरता आणि ऐक्याची गरज आहे आणि मी माझा पक्ष आणि देशाला एकत्र आणण्याला माझे सर्वोच्च प्राधान्य देईन, असे सुनक म्हणाले होते.
दुसरीकडे मावळत्या पंतप्रधान लिझ ट्रस यांनी किंग चार्ल्स यांना राजीनामा दिला. 10 डाऊनिंग स्ट्रीट येथे अंतिम मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षतेनंतर औपचारिकपणे राजीनामा देण्यापूर्वी बोलताना ट्रस म्हणाल्या की, त्यांच्या सरकारने कष्टकरी कुटुंबांना मदत करण्यासाठी तात्काळ आणि निर्णायकपणे कार्य केले आणि दिवाळखोरी टाळण्यासाठी हजारो व्यवसायांना मदत केली.
यूकेचे सर्वात कमी कालावधीच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या 45 दिवसांनी 20 ऑक्टोबर रोजी राजीनामा दिला. त्यांच्या अत्यल्प कारकिर्दीपूर्वी, त्यांचे पूर्ववर्ती बोरिस जॉन्सन, ज्यांना पंतप्रधान म्हणून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यांनी पुढील पंतप्रधान होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. परंतु 100 खासदारांचा पाठिंबा मिळवण्यात अपयशी ठरले. यानंतर सुनक यांना देशाचे नेतृत्व करण्यासाठी पुढील पंतप्रधान म्हणून घोषित करण्यात आले आहे. ते दक्षिण आशियाई वंशाचे पहिले ब्रिटिश पंतप्रधान आणि पहिले हिंदू नेते बनले आहेत.