नवी दिल्ली Nobel Peace Prize 2023 : नर्गिस मोहम्मदी यांना इराणमधील महिलांवरील अत्याचाराविरुद्धच्या लढ्याबद्दल आणि सर्वांसाठी मानवी हक्क व स्वातंत्र्याचा प्रचार करण्यासाठी दिलेल्या लढ्याबद्दल २०२३ चा नोबेल शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्या सध्या ३१ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहेत.
इराणमध्ये महिला अत्याचारांच्या विरोधात निदर्शनं : या वर्षीचा शांतता पुरस्कार अशा लाखो लोकांना समर्पित आहे, ज्यांनी स्त्रियांना लक्ष्य करणार्या व भेदभाव आणि दडपशाहीच्या शासनाच्या धोरणांविरुद्ध प्रदर्शन केलं, असं समितीनं म्हटलंय. सप्टेंबर २०२२ मध्ये, इराणच्या नैतिकता पोलिसांच्या कोठडीत महसा जीना अमिनी यांची हत्या झाली होती. त्यानंतर इराणच्या राजवटीविरुद्ध राजकीय निदर्शनं सुरू झाली.
३१ वर्षांचा तुरुंगवास : नर्गिस मोहम्मदी यांना इराणच्या राजवटीनं तब्बल १३ वेळा अटक केली आहे. त्यांना पाच वेळा दोषी ठरवण्यात आलं. त्यांना एकूण ३१ वर्षांचा तुरुंगवास व १५४ फटके मारण्याची शिक्षा ठोठावण्यात आलीय. विशेष म्हणजे, त्या अजूनही तुरुंगातच आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला, मोहम्मदी संयुक्त राष्ट्रांचा जागतिक पत्रकार स्वातंत्र्य पुरस्कार मिळवणाऱ्या तीन इराणी पत्रकारांपैकी एक होत्या.
३५१ नामांकन मिळाली होती : गेल्या वर्षीचा नोबेल शांतता पुरस्कार युक्रेन, बेलारूस आणि रशियाच्या मानवाधिकार कार्यकर्त्यांना जाहीर झाला होता. हा पुरस्कार व्यक्ती किंवा संस्थांना दिला जाऊ शकतो. इतर मागील विजेत्यांमध्ये नेल्सन मंडेला, बराक ओबामा, मिखाईल गोर्बाचेव्ह, आंग सान स्यू की आणि संयुक्त राष्ट्रांचा समावेश आहे. या वर्षी समितीला ३५१ नामांकनं मिळाली होती. यामध्ये २५९ व्यक्ती आणि ९२ संस्था सामिल होत्या.
या आधी जाहीर झालेली पारितोषिके : या आधी नोबेल समितीनं नॉर्वेजियन लेखक जॉन फॉस यांना साहित्याचा पुरस्कार दिला. बुधवारी रसायनशास्त्राचं पारितोषिक अमेरिकन शास्त्रज्ञ मौंगी बावेंडी, लुई ब्रुस आणि अलेक्सी एकिमोव्ह यांना देण्यात आलं. भौतिकशास्त्राचं पारितोषिक मंगळवारी फ्रेंच-स्वीडिश भौतिकशास्त्रज्ञ अॅन ल'हुलियर, फ्रेंच शास्त्रज्ञ पियरे अगोस्टिनी आणि हंगेरियनमध्ये जन्मलेल्या फेरेंक क्रॉझ यांना देण्यात आलं. तर हंगेरियन-अमेरिकन कॅटालिन कॅरिको आणि अमेरिकन ड्रू वेइसमन यांना सोमवारी वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळालं.
हेही वाचा :