वॉशिंग्टन (यूएस) : दोन वर्षांपूर्वी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने बंदी घातली होती. आता त्यांच्यावरील ही बंदी उठवली गेली आहे. त्यानंतर शुक्रवारी (स्थानिक वेळेनुसार) त्यांनी त्यांची पहिली फेसबुक पोस्ट लिहिली. ट्रम्प यांनी 12 सेकंदाचा व्हिडिओ पोस्ट केला असून त्यात 'मी परतलो' असे म्हटले आहे. हा व्हिडिओ 2016 च्या निवडणुकीत जिंकल्यानंतरच्या त्यांच्या विजयाच्या भाषणाचा भाग असल्याचे दिसते. 2016 च्या व्हिडिओनंतर ट्रम्प यांनी 'मेक अमेरिका ग्रेट अगेन' ही त्यांची प्रसिद्ध घोषणा दिली.
कॅपिटल दंगलीनंतर बंदी घातली होती : या आधी फेब्रुवारीमध्ये मेटाने ट्रम्प यांचे फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाउंट रिस्टोअर केले होते. मेटा येथील पॉलिसी कम्युनिकेशन्सचे संचालक अँडी स्टोन यांनी ही माहिती दिली. फेसबुकचे जागतिक घडामोडींचे अध्यक्ष निक क्लेग यांनी जानेवारीत ट्रम्प यांचे निलंबन मागे घेण्यात येणार असल्याचे सांगितले होते. 6 जानेवारी 2021 च्या कॅपिटल दंगलीनंतर मेटाने फेसबुक आणि इंस्टाग्रामवरील ट्रम्प यांची खाती निलंबित केली होती. त्यानंतर ट्रम्प यांच्या खात्यांवरील बंदी औपचारिकपणे दोन वर्षांसाठी वाढवण्यात आली होती.
सोशल मीडियाद्वारे लोकांना भडकवण्याचा आरोप : अद्याप ट्रम्प यांनी इन्स्टाग्राम किंवा फेसबुक अकाउंटवर कोणतीही नवीन पोस्ट केलेली नाही. 6 जानेवारी 2021 रोजी त्यांची शेवटची इंस्टाग्राम पोस्ट 'सेव्ह अमेरिका' होती. जिथे ते आपल्या समर्थकांना कॅपिटॉलवर मोर्चा काढण्यासाठी प्रोत्साहित करत होते. इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करताना ट्रम्प यांनी कॅप्शन दिले की, 'मी उद्या सकाळी ११ वाजता एलिप्स येथे सेव्ह अमेरिका रॅलीमध्ये बोलणार आहे'. निलंबनापूर्वी फेसबुकवरील शेवटच्या पोस्ट मध्ये त्यांनी लोकांना कॅपिटल सोडण्याचे आवाहन केले होते. फेसबुकवरील पोस्टमध्ये ट्रम्प म्हणाले होते की, 'मी कॅपिटलमधील सर्वांना शांतता राखण्यास सांगत आहे. हिंसा नको. लक्षात ठेवा, आपण कायदा आणि सुव्यवस्था राखणारा पक्ष आहोत'.
यूट्यूब खातेही रिस्टोअर : या सोबतच शुक्रवारी यूट्यूबनेही ट्रम्प यांचे खाते रिस्टोअर केले आहे. यूट्यूबने ट्विटरवर म्हटले आहे की, आजपासून डोनाल्ड ट्रम्प यांचे चॅनल प्रतिबंधित नाही. ते येथे नवीन सामग्री अपलोड करू शकतात. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संधीचा समतोल साधून, वास्तविक जगात हिंसाचाराच्या सततच्या जोखमीचे आम्ही काळजीपूर्वक मूल्यांकन केले आहे. यूट्यूबने सांगितले की, हे चॅनल यूट्यूब वरील इतर चॅनलप्रमाणे आमच्या धोरणांच्या अधीन राहील.