वॉशिंग्टन डी. सी - कोरोनावर मात करण्यासाठी आरोग्य यंत्रणेकडून विविध उपाययोजना राबवण्यात येत आहे. मात्र, कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून, चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. जगभरामध्ये गेल्या 24 तासांत 2 लाख 25 हजार 251 कोरोना रुग्ण आढळले असून 5 हजार 587 जणांचा मृत्यू झाला आहे.
अद्यावयत आकडेवारीनुसार आत्तापर्यंत जगभरात 1 कोटी 28 लाख 39 हजार 566 नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 5 लाख 67 हजार 574 कोरोनाबाधित रुग्णांची मृत्यू झाला आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे, 74 लाख 77 हजार 683 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.
तब्बल 180 पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. मात्र, सर्वांत जास्त फटका अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेत 33 लाख 55 हजार 646 जणांना कोरोनाची बाधा असून 1 लाख 37 हजार 403 जणांचा बळी गेला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर ब्राझिल आहे. ब्राझिलमध्ये 18 लाख 40 हजार 812 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आतापर्यंत 71 हजार 492 जणांचा मृत्यू झाला आहे. तर यापाठोपाठ भारत, रशिया, पेरूमध्ये कोरोना रुग्ण आढळले आहेत.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी अनेक देशांनी लॉकडाऊन जाहीर केला होता. त्यामुळे आरोग्यासह आर्थिक आणीबाणी आली आहे. अनेक देशांना वैद्यकीय उपकरणांचा तुटवडा भासत आहे, त्यातच रुग्णसंख्याही झपाट्याने वाढत आहे. जगभरामध्ये कोरोनाचा प्रसार वाढत असताना, यूस, भारत, डेन्मार्क, इटली या देशांनी लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यास सुरवात केली आहे. लॉकडाऊनमध्ये सूट दिल्याने नागरिकांचा रस्त्यावरील वावर वाढला तर कोरोनाचा समूह संसर्ग वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे.