वॉशिंग्टन डी. सी - कोरोनावर मात करण्यासाठी जगभरामध्ये युद्ध पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. तब्बल 180 पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या 24 तासांत 2 लाख 13 हजार 622 कोरोना रुग्ण आढळले असून 5 हजार 532 जणांचा मृत्यू झाला आहे.
दिवसेंदिवस रुग्णांच्या आणि मृतांच्या संख्येत वाढ होत आहे. अद्यावयत आकडेवारीनुसार आत्तापर्यंत जगभरात 1 कोटी 21 लाख 55 हजार 405 नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 5 लाख 51 हजार 184 कोरोनाबाधित रुग्णांची मृत्यू झाला आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे, 70 लाख 25 हजार 62 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.
अमेरिकेत 31 लाख 58 हजार 734 जणांना कोरोनाची बाधा असून 1 लाख 34 हजार 854 जणांचा बळी गेला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर ब्राझिल आहे. ब्राझिलमध्ये 17 लाख 16 हजार 196 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आतापर्यंत 68 हजार 55 जणांचा मृत्यू झाला आहे. तर यापाठोपाठ भारत, रशिया, पेरूमध्ये कोरोना रुग्ण आढळले आहेत.
दरम्यान कोरोनावर मात करण्यासाठी आरोग्य यंत्रणेकडून विविध उपाययोजना राबवण्यात येत आहे. मात्र, कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून, चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. जगावर आरोग्य आणीबाणी आली असून अनेक देशांना वैद्यकीय उपकरणांचा तुटवडा भासत आहे.