टोरोंटो: कॅनडामध्ये भारतीय विद्यार्थ्यांसोबत फसवणुकीची घटना घडल्याने तेथील अनेक शहरांच्या रस्त्यांवर विद्यार्थी उतरले आहेत. रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थ्यांच्या आवाज आता कॅनडाच्या संसदेत पोहोचला आहे. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या आवाजाला पंतप्रधान जस्टिन ट्रूडो साद घालत विद्यार्थ्यांना आश्वसन दिले आहे. ट्रूडो सरकार देशातील 700 भारतीय विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करेल. तसेच फसवणूक झालेल्यांना त्यांची भूमिका स्पष्ट करण्याची संधीदेखील देईल याची ग्वाही पंतप्रधानांनी दिली आहे. याचबरोबर बनावट प्रवेशपत्र देणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे म्हटले आहे.
सरकार विद्यार्थ्यांच्या पाठीशी : बनावट प्रवेशपत्रामुळे विद्यार्थ्यांना हद्दपारीचा सामना करावा लागत आहे. यामुळे कॅनडामध्ये शेकडो भारतीय विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. त्यातील बहुतेक विद्यार्थी हे पंजाबचे आहेत. यावर संसदेत बोलताना पंतप्रधानांनी सांगितले की,आमचे लक्ष दोषींना शोधण्यावर आहे. तसेच त्यांना शिक्षा करण्यावर आहे. बनावट महाविद्यालीयन प्रवेशपत्रामुळे हकालपट्टीचा सामना करणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या प्रकरणाची माहिती आपल्याला आहे. देशासाठी विद्यार्थ्यांनी दिलेले योगदानही माहिती आहे. त्यामुळे कॅनडा सरकार हे फसवणूक झालेल्यांच्या पाठीशी आहे.
दोषींना शोधण्यावर सरकारचे लक्ष : या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, भारतातील त्यांच्या इमिग्रेशन समुपदेशन एजन्सीने त्यांची फसवणूक केली. त्यांनी त्यांना बनावट कागदपत्रे दिली होती. या फसवणुकीचा सुगावा विद्यार्थ्यांना नव्हता. यावरुन ट्रूडो यांनी बुधवारी संसदेत झालेल्या चर्चेदरम्यान सांगितले की, बनावट कॉलेज स्वीकृती पत्रांसाठी निष्कासनाच्या म्हणजेच हद्दपारीच्या आदेशाचा सामना करणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची प्रकरणे आपल्याला माहिती आहेत. विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या गुन्हेगारांना शोधण्यावर आमचे लक्ष आहे.
कायमस्वरुपी वास्तव्यासाठी प्रयत्न सुरू : शीख वंशाचे एनडीपी नेते जगमीत सिंग यांनी पीडित विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत संसदेत चिंता व्यक्त केली होती. दरम्यान सिंग यांचा पक्ष एनडीपी पीडित या विद्यार्थ्यांच्या हकालपट्टीचे आदेश रद्द करण्यासाठी तसेच कायमस्वरूपी निवासाचा मार्ग सुकर करण्यासाठी संसदेत ठराव मांडण्याच्या तयारीत आहे. त्यानुसार त्यांनी संसदेत पंतप्रधानांना प्रश्न केला होता. पंतप्रधान या सर्व पीडित विद्यार्थ्यांची हद्दपारी थांबवतील आणि या विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी राहण्याचा मार्ग मोकळा करतील का?"असा जगमीत सिंग यांनी केला होता. यावर पंतप्रधान ट्रुडो यांनी उत्तर दिले आहे.
फसवणुकीला बळी पडलेल्या विद्यार्थ्यांना त्यांची भूमिका स्पष्ट करण्याची आणि पुरावे सादर करण्याची संधी दिली जाईल. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांनी आमच्या देशासाठी दिलेले मोठे योगदान आम्ही जाणून आहोत. पीडितांना मदत करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. यासोबतच त्यांच्यासाठी कायमस्वरूपी वास्तव्याचा मार्गही सुकर करण्यात येत आहे. -पंतप्रधान ट्रूडो
काय आहे प्रकरण : बनावट प्रवेशपत्र असलेल्या विद्यार्थ्यांना कॅनडा सोडण्याचे आदेश दिल्यानंतर विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. विद्यार्थी 29 मे पासून मिसिसॉगा येथील एअरपोर्ट रोडवर सीबीएसएच्या मुख्य कार्यालयाबाहेर बेमुदत उपोषण करत आहेत. हद्दपारीच्या विरोधात युनायटेड डिपोर्टेशन, स्टॉप डिपोर्टेशन आणि वुई वॉन्ट जस्टिस असे बॅनर लावले आहेत. कॅनेडियन बॉर्डर सर्व्हिस एजन्सी (CBSA) च्या मते, 700 हून अधिक भारतीय विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक संस्थांमध्ये त्यांच्या प्रवेशाची ऑफर लेटर बनावट असल्याचे सांगितले. त्यामुळे या विद्यार्थ्यांना हद्दपारीचा सामना करावा लागत आहे. यातील बहुतांश विद्यार्थी 2018 आणि 2019 मध्ये कॅनडामध्ये शिकण्यासाठी आले होते. विद्यार्थ्यांनी कॅनडामध्ये कायमस्वरूपी निवासासाठी अर्ज केल्यावर ही फसवणूक उघडकीस आली. जालंधरचा एजंट ब्रिजेश मिश्रा बनावट प्रवेशपत्र देण्याच्या बदल्यात विद्यार्थ्यांकडून हजारो डॉलर्स उकळण्यास जबाबदार आहे. प्रतिष्ठित महाविद्यालयात प्रवेश मिळवून देतो, असे सांगून त्याने प्रवेश शुल्काव्यतिरिक्त प्रति विद्यार्थ्यांकडून 16 लाखांहून अधिक रक्कम घेतली होती.
हेही वाचा -