काबूल - तालिबानी बंडखोरांनी केलेल्या हल्ल्यात अफगाणिस्तान लष्कर आणि पोलीस दलातील २० जवान ठार झाले आहेत. त्याआधी नुकतेच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तालिबानच्या नेत्यांना फोन करून शांततेचे आवाहन केले होते. या हल्ल्यामुळे तालिबान शांतता करारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
काल (मंगळवारी) तालिबानने शांततेचा भंग करत अफगाणिस्तानच्या लष्करी तळांवर हल्ला केला होता. आज पुन्हा केलेल्या हल्ल्यात २० जवानांचा मृत्यू झाला आहे. कुंड्झ प्रांतातील इमाम साहीब जिल्ह्यामधील लष्कराच्या तीन चौक्यांवर हा हल्ला करण्यात आला. डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारीही तालिबान नेत्यांशी चर्चा केली होती.
नुकताच अमेरिकेने तालिबान सोबत शांतता करार केला असून त्यानुसार १८ वर्षांनंतर अमेरिकेचे सैन्य अफगानिस्तानच्या धरतीवरून माघारी जाणार आहे. शांतता करारावर दोन्ही बाजूंकडील नेत्यांनी सह्या केल्या आहेत. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव माईक पोम्पिओ हे अमेरिकेतर्फे उपस्थित होते. या करारानुसार येत्या १४ महिन्यांत अमेरिका आणि सहयोगी देशांचे सैन्य अफगाणिस्तानमधून माघारी जाणार आहे.