जेरुसलेम - दारूच्या बाटल्यांवर महात्मा गांधींचा फोटो लावल्यानंतर वादात सापडलेल्या एका इस्त्रायली कंपनीने भारत सरकार आणि भारतीय जनता यांच्या भावना दुखवल्या बाबत माफी मागितली आहे. इस्त्रायलमधील माकाब्रेव्हरी या दारूच्या कंपनीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा फोटो दारूच्या बाटल्यांवर लावला होता.
या घटनेचा नवी दिल्लीत आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांच्या समवेत राज्यसभेच्या विविध सदस्यांनी निषेध केला होता. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्यसभेचे अध्यक्ष एम. व्यंकया नायडु यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना या विषयावर चौकशी करण्याचे आणि आवश्यक ती कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
माका ब्रेव्हरी कंपनीचे ब्रँड मॅनेजर गिलाड ड्रोर यांनी, भारत सरकार व भारतीय जनता यांच्या भावना दुखवल्या बाबत क्षमा मागितली. ते म्हणाले, 'आम्हीदेखील महात्मा गांधी यांचा सन्मान करतो, यामुळेच बाटल्यांवर महात्मा गांधी यांचे चित्र लावल्याबद्दल आम्ही माफी मागत आहोत.'
या माफीनाम्याच्या शेवटी, भारतीय दुतावासाकडून या मुद्द्यावर जोर देण्यात आल्याने, 'आपण या बाटल्यांचे उत्पादन थांबवत आहोत. तसेच बाजारातूनही या उत्पादनाला हटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भविष्यात पुन्हा, अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत, अशी ग्वाही गिलाड ड्रोर यांनी दिली.'
इस्त्राईलच्या ७१ व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर या उत्पादनाची निर्मीती करण्यात आली होती.