काबुल : अफगाणिस्तानच्या स्वातंत्र्यदिनादिवशीच राजधानी काबुलमध्ये ठिकठिकाणी स्फोट झाले. या स्फोटांमध्ये दहा नागरिक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. तालिबानसोबत अफगाण सरकारची शांतता चर्चा सुरू होण्याची चिन्हे दिसतानाच हे स्फोट झाले आहेत. या स्फोटांची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने घेतली नाही.
देशाच्या गृहमंत्रालयाचे प्रवक्ते तारिक आरियन यांनी दिलेल्या माहितीनुसार, काबुलच्या उत्तर आणि पूर्व भागामध्ये १४ ठिकाणी मोर्टर शेल हल्ले झाले. यामध्ये जखमी झालेल्या नागरिकांत चार लहान मुलांचाही समावेश आहे. यांपैकी अनेक शेल्स हे नागरिकांच्या घरांवर फेकण्यात आले होते. याबाबत अधिक चौकशी सुरू आहे.
तर, प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, वजीर अकबर खान परिसरामध्येही हल्ला झाला होता. या परिसरात मोठ्या प्रमाणात सरकारी अधिकारी राहतात.
या हल्ल्याच्या एक दिवस आधीच अफगाण सरकारने असे जाहीर केले होते; की जोपर्यंत तालिबान आणखी काही सैनिकांची मुक्तता करत नाहीत, तोपर्यंत आणखी ३२० तालिबांनींची सुटका करण्यात येणार नाही. या महिन्यातच सुरूवातीला ४०० तालिबान्यांची सुटका करण्याचा निर्णय अफगाणने घेतला होता. त्यामुळे तालिबानसोबत शांतता चर्चांना पुन्हा सुरूवात होण्याची शक्यता दिसत होती.
हेही वाचा : अफगाणिस्तानमधील शीख आणि हिंदू अल्पसंख्यांकांची स्थिती चिंताजनक - यूएस ठराव