जेरुसलेम - पॅलेस्टाईनमधून भारतासाठी अत्यंत दु:खद बातमी समोर येत आहे. पॅलेस्टाईनमधील भारतीय राजदूताचा ( Indian envoy to Palestine Mukul Arya dies ) संशयास्पद मृत्यू झाला आहे. या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश पॅलेस्टाइन सरकारने दिले आहेत. याबाबत परराष्ट्र मंत्रालयाने माहिती दिली आहे. पॅलेस्टाईनमधील भारताचे राजदूत मुकुल आर्य हे त्यांच्या दूतावासात मृतावस्थेत ( Mukul Arya found dead in embassy ) आढळले आहेत. भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी याबद्दल शोक व्यक्त केला आहे.
भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी ट्विट करून पॅलेस्टाईनमधील भारताचे राजदूत मुकुल आर्य यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट केले, की 'पॅलेस्टाईनमधील रामल्ला येथील भारताचे प्रतिनिधी श्री मुकुल आर्य यांच्या निधनाची बातमी कळताच खूप धक्का बसला. आर्या हे एक तेजस्वी आणि प्रतिभावान अधिकारी होते. त्याच्यासमोर अद्याप बरेच काही होते. त्यांच्या कुटुंबीयांना आणि प्रियजनांप्रती मी मनापासून संवेदना व्यक्त करतो. ओम शांती.'
पॅलेस्टाईनच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. यात पॅलेस्टाईनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने राजदूत मुकुल आर्य यांच्या निधनाबद्दल दु:ख आणि वेदना व्यक्त केल्या आहेत. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्कात असून पार्थिव त्यांच्या देशात नेण्याची व्यवस्था करण्यात येत असल्याचे पत्रात म्हटलं आहे.
याशिवाय, राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास आणि पंतप्रधान मुहम्मद शतायेह यांनी सर्व सुरक्षा, पोलीस आणि सार्वजनिक अधिकार्यांना तत्काळ सूचना जारी केल्या आहेत. तसेच आरोग्य आणि फॉरेन्सिक औषध मंत्रालये यांनी तात्काळ रामल्ला येथील भारतीय राजदूताच्या निवासस्थानी जाण्याचे निर्देश दिले आहेत. मुकुल आर्य यांना मृत्यूची माहिती गोळा करण्याचे निर्देश त्यांना देण्यात आले आहेत.
कोण होते मुकुल आर्य -
मुकुल आर्य हे अत्यंत हुशार अधिकारी होते. त्यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून अर्थशास्त्रात एमए केले. 2008 मध्ये आर्य भारतीय परराष्ट्र सेवेत रुजू झाले. मुकुल आर्य हे परराष्ट्र मंत्रालयात मुत्सद्दी होते. आर्य यांनी पॅरिसमधील युनेस्कोमध्ये भारताच्या स्थायी प्रतिनिधी मंडळात आणि काबूल आणि मॉस्कोमधील भारतीय दूतावासात काम केले होते. याशिवाय त्यांनी दिल्लीतील मंत्रालयातही सेवा बजावली आहे.
हेही वाचा - गाझा पट्ट्यातील हिंसाचाराला पूर्णविराम; इस्राईल-हमासची शस्त्रसंधीस मान्यता