इस्लामाबाद - पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे गुरुवारी कतारच्या दौऱ्यावर असणार आहेत. कतारची राजधानी असलेल्या दोहामध्ये दोन दिवसांनंतर होणाऱ्या बहुचर्चित अमेरिका-तालिबान शांती कराराच्या पार्श्वभूमीवर, खान यांच्या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. पंतप्रधान पदाचा पदभार सांभाळल्यानंतर इम्रान खान यांची ही दुसरी कतार भेट असणार आहे.
पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याने बुधवारी रात्री दिलेल्या माहितीनुसार, नियमित होणाऱ्या उच्चस्तरीय भेटीसाठी, पंतप्रधान इमरान खान हे २७ फेब्रुवारीला कतारला भेट देतील. यावेळी ते कतार राष्ट्राचे आमीर, शेख तामिम बिन हमाद अल थानी यांच्याशी चर्चा करतील. मात्र, शनिवारी शांतता करारावर होणाऱ्या स्वाक्षरी समारंभासाठी मात्र खान उपस्थित राहणार नाहीत. साधारणपणे चोवीसहून अधिक देशांचे प्रतिनिधी या समारंभाला उपस्थित राहणार आहेत. या समारंभासाठी पाकिस्तानतर्फे देशाचे परराष्ट्रमंत्री शेख महमूद कुरेशी हे उपस्थित राहणार आहेत.
तब्बल १८ महिन्यांच्या चर्चेनंतर, अखेर अमेरिका आणि दहशतवादी संघटनांमध्ये एक करार अस्तित्वात येत आहे. या कराराद्वारे हे निश्चित केले जाणार आहे, की युद्धग्रस्त देशांमधून परदेशी सैन्य हटवण्यात येईल. याबदल्यात, अफगाणमधील जमिनीचा वापर इतर कोणत्याही देशाविरोधात होणार नाही, यास तालिबानने संमती दर्शवली आहे.
हेही वाचा : दक्षिण कोरियात आणखी 334 जण कोरोनाच्या तडाख्यात, बाधितांचा आकडा 1,595 वर