बैरुत- लेबनॉन मधील बैरुत येथे या आठवड्यात झालेल्या मोठ्या स्फोटांमुळे जनता संतप्त झाली होती. या संतापाने शनिवारी रात्री एक नवीन वळण घेतले. निदर्शकांनी सरकारी संस्थांवर जोरदार हल्ला केला, यामुळे सुरक्षा दलांशी त्यांची चकमक झाली. सुरक्षा दलांनी अश्रुधुराच्या वायूच्या कांड्या आणि रबरच्या गोळ्यांनी प्रत्युत्तर दिले.
सुरक्षा दले आणि निदर्शकांमध्ये झालेल्या चकमकीमध्ये एका पोलिसाचा मृत्यू झाला तर बारा लोक जखमी झाले आहेत. बैरुतमध्ये मंगळवारी झालेल्या स्फोटात 160 लोकांचा मृत्यू झाला. 12 जण अद्याप बेपत्ता असून 6 हजार जण जखमी झाले आहेत. लेबनॉन अगोदरच आर्थिक संकटाने दिवाळखोरीत असताना स्फोटामुळे परिस्थिती आणखी बिघडली आहे.
निदर्शकांनी बैरुतच्या शहीद चौकात आंदोलन केले. भ्रष्टाचार आणि राजकारण्यांच्या दुर्लक्षामुळे स्फोट झाल्याचा आरोप निदर्शकांनी केला. घटनेला जबाबदार असणाऱ्यांना फाशी देण्याची मागणी त्यांनी केली. बैरुत मध्ये अमोनियम नाइट्रेटचा साठा अशास्त्रीय पद्धतीने सहा वर्ष साठवून ठेवण्यात आला होता. त्याचा परिणाम आग लागून स्फोट होण्यामध्ये झाला. लेबनॉनच्या इतिहासामधील हा सर्वात मोठ्या क्षमतेचा स्फोट होता.
बैरुतच्या राज्यपालांच्या म्हणण्यानुसार, हा स्फोट लेबनॉनच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात मोठा स्फोट होता आणि अंदाजे 10 अब्ज ते 15 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले. यामुळे 6,200 इमारतींचे नुकसान झाले आणि शेकडो हजारो लोक बेघर झाले.
या घटनेला जबाबदार असणाऱ्यांनी राजीनामा द्यावा किंवा त्यांना फाशी देण्यात यावी, अशी मागणी निदर्शकांनी केली. मृत्यू झालेल्यावर प्रतीकात्मक अंत्यसंस्कार करण्याचे आंदोलन त्यांनी केले. 23 वर्षीय खोदर गदीर म्हणाले की, गेल्या 30 वर्षांपासून सत्तेत असलेल्या प्रत्येकासाठी विचार करायला लावणारी गोष्ट होती. लोक रस्त्यावर परत येण्यासाठी ही एक ठिणगी होती. निदर्शकांनी हातात पोस्टर घेतली होती. त्यावर स्फोटाचे चित्र आणि मृतांची नावे लिहिली होती. निदर्शकांनी सरकारी मंत्रालये आणि बँकिंग असोसिएशनच्या मुख्यालयाच्या इमारतींवर धडक दिली आणि त्यानंतर त्यांचा मोर्चा राज्य आणि वित्तीय संस्थांकडे वळविला.
शनिवारी, आंदोलकांनी परराष्ट्र मंत्रालयाच्या रिकाम्या इमारतींमध्ये प्रवेश केला आणि ते आंदोलकांचे मुख्यालय असल्याचे जाहीर केले.त्यानंतर काहींनी अर्थ आणि ऊर्जा मंत्रालयांमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. काहींनी पर्यावरण मंत्रालयात प्रवेश केला. बर्याच आंदोलकांनी सांगितले की आता त्यांच्याकडे फक्त घरे आहेत आणि ती आता सुरक्षित नाहीत. या परिस्थितीला सरकारच्या अकार्यक्षमतेला जबाबदार धरले.
फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि संयुक्त राष्ट्र संघटनेचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेच्या पूर्वसंध्येला हा हिंसाचार झाला.शनिवारी सायंकाळी एका दूरध्वनी भाषणात पंतप्रधान हसन डायब म्हणाले की, देशात लवकरात लवकर निवडणुका घेणे हाच मार्ग आहे. सर्व राजकीय पक्षांना त्यांचे मतभेद बाजूला ठेवण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले.