बैरुत : वायव्य सीरियातील एका बंडखोर सैनिकांच्या प्रशिक्षण केंद्रावर झालेल्या एअरस्ट्राईकमध्ये ५०हून अधिक तुर्की सैनिक ठार झाले, आणि तेवढेच जखमी झाले आहेत. विरोधी पक्षाने यासाठी रशियाला जबाबदार ठरवत, आपण लवकरच याला प्रत्युत्तर देऊ अशी घोषणा केली आहे. याबाबत अद्याप रशिया किंवा तुर्की सरकारकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही.
सीरियातील विरोधी पक्षाचे प्रवक्ते युसैफ हम्मूद यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिरियाच्या वायव्य भागात असणाऱ्या इडलिब प्रांतात हा हल्ला झाला. याठिकाणी असलेल्या फायाक अल-शाम या संघटनेच्या प्रशिक्षण केंद्रावर हा हवाई हल्ला करण्यात आला. फायाक अल-शाम हा तुर्की-स्थित सर्वात मोठा आणि उत्तमरित्या प्रशिक्षित बंडखोर सैनिकांचा समूह आहे. सिरियामधील बंडखोर चळवळींना तुर्की पहिल्यापासून मदत करत आला आहे.
पत्रकारांना मज्जाव..
हल्ला झाल्यानंतर प्रशिक्षण केंद्राचा परिसर सील करण्यात आला असून, पत्रकार किंवा इतर लोकांना याठिकाणी जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. त्यामुळे त्याठिकाणी सध्या काय परिस्थिती आहे याबाबत कोणालाही स्पष्ट माहिती नाही. मानवी हक्क आयोगाचे एक पथक सीरियामधील युद्धांवर लक्ष ठेऊन आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्यात ७८ सैनिक ठार आणि ९०हून अधिक जखमी झाले आहेत.
रशियाने केला हल्ला..?
मानवी हक्क आयोगाच्या समितीलाही या हल्ल्याबाबत रशियावर संशय आहे. सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर असाद यांचे रशियाशी घनिष्ठ संबंध आहेत. तसेच, सीरियामधील बंडखोर सैनिकांचे आणखी एक प्रवक्ते नाजी अल-मुस्तफा यांनीही या हल्ल्यांसाठी सीरियाला जबाबदार ठरवत, आम्ही लवकरच या हल्ल्यांना प्रत्युत्तर देऊ असे म्हटले.
हवाई हल्ल्यांमध्ये वाढ..
शुक्रवारी सीरियामधील जराब्लस प्रांतातील एका मार्केटवर हवाई हल्ला करण्यात आला होता. यामध्ये सात लोकांचा मृत्यू झाला होता. तर, गेल्या आठवड्यात तुर्की सैनिकांनी त्यांचे परिसरातील मोठे प्रशिक्षण स्थळ रिकामे केले होते.
हेही वाचा : स्पेनमध्ये कोरोनाची दुसरी लाट; सरकारकडून आणीबाणी घोषित