काबुल : अफगाणिस्तानमधील सुरक्षा दलांनी केलेल्या एका एअरस्ट्राईकमध्ये १८ तालिबानी दहशतवादी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. पूर्व अफगाणिस्तानमधील नानगरहर प्रांतामध्ये ही कारवाई करण्यात आली. प्रांताचे गव्हर्नर झियाऊलहग अमरखील यांनी याबाबत शुक्रवारी माहिती दिली.
तालिबान्यांचा हल्ल्याचा प्रयत्न; प्रत्युत्तर म्हणून कारवाई..
नानगरहर प्रांतामधील पाचीरागम जिल्ह्यात करण्यात आलेल्या एअर स्ट्राईकमध्ये १८ तालिबान्यांचा खात्मा करण्यात आला आहे, असे अमरखील यांनी सांगितले. गुरुवारी रात्री उशीरा ही कारवाई करण्यात आली. तालिबान्यांनी याठिकाणी असलेल्या सुरक्षा दलांच्या चेकपॉईंट्सवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. याला प्रत्युत्तर म्हणून हा एअरस्ट्राईक करण्यात आल्याची माहिती अमरखील यांनी दिली.
यासोबतच, या संपूर्ण कारवाईदरम्यान कोणाही सामान्य नागरिकांवर परिणाम झाला नाही. यामध्ये एकही सामान्य नागरिक जखमी झाला नसल्याचे अमरखील यांनी स्पष्ट केले.
शांतता चर्चा निष्फळ; तालिबान-अफगाणिस्तान संघर्ष सुरुच..
अफगाणिस्तान आणि तालिबानी संघटनांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून शांतता चर्चा सुरू आहेत. कतारची राजधानी असलेल्या दोहामध्ये याबाबत कित्येक चर्चांच्या फेऱ्या आतापर्यंत पार पडल्या आहेत. मात्र, या चर्चांमधून आतापर्यंत कोणताही निष्कर्ष समोर आला नसून, तालिबान आणि अफगाणिस्तानी सैन्य यामधील संघर्ष सुरुच असल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा : भारत-बांगलादेश सीमेवर पोलिसांना आढळला गुप्त बोगदा