रियाध - जगभरामध्ये कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. सौदी अरेबियामध्ये 11 भारतीयांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती सौदीमधील भारतीय दुतावासाने दिली आहे. यामध्ये 4 जणांचा मदिना, 3 जणांचा मक्का, 2 जणांचा जेद्दा तर रियाध आणि दम्माम येथे प्रत्येकी एकाचा मुत्यू झाला आहे.
सौदीमधील भारतीय नागिरकांनी खबरदारी बाळगावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्यानुसार, अफवावर विश्वास ठेऊ नये. महामारी ही जात, धर्म, रंग , भाषा पाहत नाही. त्यांची कोणालाही लागण होऊ शकते. त्यामुळे एकता आणि बंधुत्वाला प्राधान्य द्यावे, असेही सौदीमधील भारतीय दुतवासाने जारी केलेल्या पत्रात म्हटले आहे.
सौदी अरेबियामधील भारतीय राजदूत औसाफ सईद यांनी 22 एप्रिल रोजी राज्यभरातील छोट्या शहरांतील भारतीय समुदायातील स्वयंसेवकांशी संवाद साधला. सौदीमधील गरजू भारतीयांना अन्न , औषधे आणि इतर आपत्कालीन मदत करण्यात येत असल्याची माहिती दिली.
दरम्यान कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण जग लढा देत आहे. सर्वसामान्य व्यक्ती असो की कोणी शाही राजघराण्यातील बडी हस्ती कोणीच कोरोनाच्या कचाट्यातून सुटले नाही. सौदी अरेबियातील शाही परिवारामधील 150 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान आयलोसेशनमध्ये गेले आहेत.