लंडन - इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना अजूनही कोरोनाची लक्षणे दिसून येत असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. २७ मार्चला त्यांनी स्व-विलगीकरणात जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यांचा सात दिवसांचा विलगीकरण कालावधी संपण्यासाठी एक दिवस बाकी आहे, मात्र त्यांना अद्यापही कोरोनाची लक्षणे दिसून येत आहेत.
२७ मार्चला स्व-विलगीकरणात गेल्यानंतर ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कामकाज पाहत होते. शुक्रवारी ते विलगीकरणातून बाहेर येण्याची शक्यता याआधी व्यक्त करण्यात येत होती. याबाबत विचारणा केली असता, एका प्रवक्त्याने सांगितले, की आम्ही पीएचईने दिलेल्या सूचनांचे पालन करत आहोत. त्यामुळे सात दिवसांच्या आत ते बाहेर येणार नाहीत. तसेच, त्यांना दिसणारी लक्षणे ही अतीशय सौम्य स्वरुपाचे असल्याचेही प्रवक्त्याने स्पष्ट केले.
दरम्यान, इंग्लंडचे मुख्य वैद्यकीय अधिकारी ख्रिस व्हिट्टी यांनीही स्वतः ला स्व-विलगीकरणात ठेवले आहे. मात्र, आपल्या प्रकृतीबाबत त्यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही. तर आरोग्य सचिव मॅट हॅनकॉक हे गुरूवारी आपल्या सात दिवसांच्या विलगीकरण कालावधीनंतर बाहेर आले, आणि त्यांनी पत्रकार परिषद घेत आपली पंचसूत्री योजना जाहीर केली. या योजनेनुसार इंग्लंडमध्ये दररोज सुमारे एक लाख नागरिकांची तपासणी केली जाणार आहे.
दरम्यान, आत्तापर्यंत युरोपीय देशांमध्ये कोरोनाचे 5 लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत. स्पेनमध्ये 10 हजार तर इटलीमध्ये 13 हजारांपेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचा : ट्रम्प यांची दुसरी कोरोना चाचणी निगेटिव्ह