लंडन - ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अस्त्राझेनेका कंपनीने तयार केलेल्या कोरोना लसीला ब्रिटनने परवानगी दिली आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा विषाणू सापडला असून हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर रुग्ण वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. नवा विषाणू जास्त संसर्गजन्य असल्याची माहिती पुढे येत असताना ब्रिटनने लसीकरणाचा वेग वाढवला आहे.
ऑक्सफर्डच्या लसीला मान्यता देणार ब्रिटन पहिला देश -
ऑक्सफर्डच्या लसीला मान्यता देणारा ब्रिटन हा पहिला देश ठरला आहे. ब्रिटनच्या 'मेडिसिन आणि हेल्थकेअर प्रोडक्टस् रेग्युलेटरी एजन्सी'ने (MHRA) लस वापरण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. ऑक्सफर्ड आणि अस्त्राझेनेका कंपनी तयार करत असलेल्या लसीसोबत भारताच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कंपनीनेही सहकार्य करार केला आहे. भारतात सीरमने आणीबाणीच्या परवान्यासाठी अर्ज केला असून त्यास अद्याप मान्यता देण्यात आली नाही. सरकारकडून लस वापराबाबत सध्या काळजीपूर्वक विचार सुरू आहे.
युरोपात नव्या विषाणूचा फैलाव -
कोरोनामुळे आत्तापर्यंत जगात १७ लाख रुग्णांचा मृत्यू झाला असून कोट्यवधी नागरिकांना लागण झाली होती. युरोपात सध्या पुन्हा नव्या विषाणूची भीती पसरली आहे. ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा विषाणू आढळून आल्याने पुन्हा लॉकडाऊन करण्यात आले आहे. नव्या विषाणूविरोधात अस्त्राझेनेकाची लस काम करले, असे कंपनीने म्हटले आहे.
भारतात परवानगी कधी मिळणार?
सीरम कंपनीसह काही परदेशी कंपन्यांनी भारतात आणीबाणीच्या काळात कोरोनावरील लस वापरासाठी अर्ज केला आहे. मात्र, अद्याप कोणत्याही लसीला भारतात परवानगी देण्यात आली नाही. भारताचे औषध महानियंत्रक कार्यालय, आरोग्य मंत्रालय आणि केंद्र सरकारने विविध विभाग या लसींची चाचपणी करत असून पूर्ण तपासणीनतंरच लसीला परवानगी देण्यात येणार आहे. याबाबत लवकरच बैठक होणार असल्याचीही माहिती पुढे येत आहे. भारत बायोटेक, झायडस कॅडिला या कंपन्यांनी भारतात कोरोनावर लस तयार करत आहेत.