मॉस्को - रशियाचे पंतप्रधान दिमित्री मेद्वेदेव यांनी आपला राजीनामा राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्याकडे दिला आहे. त्यामुळे रशियाचे सरकार कोसळले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुतीन यांनी दिमित्री यांचे त्यांनी दिलेल्या सेवेसाठी आभार मानले आहे. मात्र, त्याचवेळी त्यांनी हेही म्हटले की दिमित्री यांचे मंत्रीमंडळ हे त्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकले नाही. रशियन माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, मेद्वेदेव यांच्याकडे राष्ट्रपती सुरक्षा परिषदेचे उपाध्यक्षपद देण्याचा पुतीन यांचा मानस आहे.
दिमित्री हे २०१२ पासून रशियाच्या पंतप्रधानपदी होते. त्याआधी २००८ ते २०१२ पर्यंत ते रशियाचे राष्ट्राध्यक्ष होते. रशियाचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी बुधवारी देशाच्या जनतेला संबोधित करत दिमित्री यांच्या राजीनाम्याबाबत माहिती दिली. यावेळी केलेल्या भाषणामध्ये त्यांनी देशाच्या संविधानामध्ये बदल करण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. पंतप्रधान आणि कॅबिनेट मंत्र्यांच्या अधिकारांमध्ये वाढ करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तसेच, नवीन मंत्रीमंडळ स्थापन होईपर्यंत पुतीन यांनी दिमित्री यांच्या मंत्रीमंडळाला कार्यरत राहण्याचे आदेश दिले आहेत.
२०२४ मध्ये पुतीन यांचा राष्ट्राध्यक्ष म्हणून कार्यकाळ संपत आहे. त्यामुळे, मंत्रीमंडळामध्ये आपल्याला एक शक्तीशाली स्थान मिळावे यासाठी पुतीन प्रयत्न करत आहेत, असा अंदाज राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.
हेही वाचा : इराण अण्विक कराराची जागा आता 'ट्रम्प डील' घेणार?