बर्लिन - जर्मन चॅन्सेलर अँजेला मर्केल यांनी तुर्कीने सीरियातील युद्धखोरी ताबडतोब थांबवावी, अशी मागणी केली आहे. तुर्कीने उत्तर सीरियात कुर्दांविरोधात लष्करी कारवाईला सुरुवात केली आहे. तुर्की अध्यक्ष रिसेप ताय्यिप एर्दोगन यांच्याशी फोनवर संपर्क साधून मर्केल यांनी ही मागणी केली. जर्मन सरकारचे प्रवक्त्यांनी ही माहिती दिली.
तुर्की आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांद्वारे सीरियातील कुर्दांच्या कब्ज्यात असलेल्या क्षेत्रांमध्ये लष्करी मोहीम उघडली आहे. विरोधात जर्मनीच्या विविध शहरांमध्ये २० हजार कुर्दांनी विरोध प्रदर्शन केले. बुधवारी तुर्की आणि त्याच्या मित्र राष्ट्रांद्वारे उत्तर सीरियात कुर्द विद्रोह्यांच्या विरोधात चालवण्यात आलेल्या लष्करी मोहिमेत ३० लोक मारले गेले. या पार्श्वभूमीवर मर्केल यांची मागणी महत्त्वाची ठरत आहे.
तुर्कीच्या आक्रमकतेमुळे मोठ्या प्रमाणात सीरियातील लोकसंख्या विस्थापित होऊ शकते. याचा शेजारील देशांवर परिणाम होईल. तसेच, इसिस (ISIS - इस्लामिक स्टेट) या दहशतवादी संघटनेला डोके वर काढण्याची संधी मिळू शकते, अशी भीती मर्केल यांनी व्यक्त केली.
जर्मनीतील कोलोन शहरात सर्वाधिक 10 हजाराहून अधिकांनी रॅली काढली. तर, फ्रँकफुर्टमध्ये जवळपास 4 हजार, हॅम्बर्गमध्ये 3 हजार लोकांनी निदर्शने केली. याशिवाय, बनोवर, ब्रेमेन, बर्लिन आणि सारब्रुकेनमध्येही विरोधप्रदर्शन करण्यात आले.