मॉस्को : शांघाय सहकार संस्थेच्या बैठकीसाठी सध्या परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर रशियाच्या दौऱ्यावर आहेत. यातच, गुरुवारी रशिया-भारत-चीन (आरआयसी) या तीन देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक पार पडली. यावेळी या तिघांनी त्रिपक्षीय संबंध सुधारण्याबाबत चर्चा केली. तसेच, आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक स्तरावर महत्त्वाचे असणाऱ्या विशिष्ट विषयांवर चर्चा केली. "रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्जे लॅव्हरोव्ह यांनी आयोजित केलेल्या त्रिपक्षीय बैठकीस हजेरी लावली. त्यांनी केलेल्या आदरातिथ्याबाबत त्यांचे आभार" अशा आशयाचे ट्विट करत देशाचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी याबाबत माहिती दिली.
या बैठकीनंतर तिन्ही देशांनी संयुक्तपणे जाहीर केलेल्या निवेदनानुसार, या बैठकीत तिन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी त्रिपक्षीय संबंध आणखी मजबूत करण्यासंबंधी चर्चा केली. तसेच परस्पर सहकार्य, विश्वास आणि मैत्री कायम राखण्याबाबतही यादरम्यान बोलणी झाली. जागतिक स्तरावर शांतता, विकास आणि स्थैर्याला चालना देण्यासाठी तिन्ही देशांचा समान विकास आणि सहकार्य आवश्यक आहे, याबाबत तिन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी एकमत नोंदवले.
आपल्याकडे असणाऱ्या वैज्ञानिक आणि औद्योगिक ताकदीच्या जोरावर कोरोना महामारीला लढा देण्यासाठी हे तीन देश मोलाची भूमीका बजावू शकतात, याबाबतही सर्वांचे एकमत झाले. तसेच, या बैठकीदरम्यान जयशंकर यांनी आरआयसीच्या अध्यक्षपदाचा पदभार अधिकृतरित्या स्वीकारला. यापूर्वी सर्जे हे या समितीचे अध्यक्ष होते.
हेही वाचा : भारत-चीन सीमातणाव : सीमेवरील सैनिक मागे हटवण्यावर दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांचे एकमत