काइव्ह - युक्रेनमध्ये वैमानिक प्रशिक्षणार्थींना घेऊन जाणारे लष्कराचे विमान लॅंडिंग दरम्यान दुर्घटनाग्रस्त झाले. शुक्रवारी (25 सप्टेंबर) रोजी झालेल्या अपघातात 25 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक आपत्कालीन विभागाने दिली आहे.
चुहुव्ह येथील धावपट्टीवर उतरताना एएन -26 विमानाला अपघात झाला. हा भूभाग राजधानी काइव्ह पासून 400 किलोमीटर दूर आहे. यानंतर आपत्कालीन यंत्रणा तत्काळ घटनास्थळी दाखल झाली. बचावकार्य सुरू झाल्यानंतर काही मृतदेह सापडल्याची माहिती मिळत आहे.
खारकिव्ह प्रांतातील या विमान दुर्घटनेत 25 नागरिक दगावल्याची माहिती गव्हर्नर ओलेक्सी कुचर यांनी दिली. स्थानिक वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इंजिनमध्ये बिघाड झाल्याने विमान कोसळले. युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या वृत्ताला दुजोरा मिळतो.
युक्रेनच्या सरकारी माहितीनुसार या विमानात 21 प्रशिक्षणार्थी होते. तर, सात क्रू मेंबर्स होते.
सूत्रांच्या माहितीनुसार वैमानिकाने रडारद्वारे इंजिनमध्ये बिघाड झाल्याची माहिती दिली. तसेच इंजिन प्रतिसाद देत नसल्याने विमान खाली येत असल्याचे त्याने सांगितले. या दुर्घटनेत 25 जणांचा मृत्यू झाला असून दोघे अत्यवस्थ आहेत. अन्य एकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे.
एएन -26 विमानाचा कमांडर 30 वर्षांचा मेजर पदावरील अधिकारी होता. त्याचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे.